जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हिवरेचा डावखरेंवर पुन्हा विश्वास; निरंजन डावखरेंची मतदार प्रतिनिधी म्हणून निवड
Pune Bank Election : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी हिवरे गावानं निरंजन डावखरेंची मतदार प्रतिनिधी म्हणून निवड केली.
Pune District Central Cooperative Bank Election : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील हिवरे गावानं पुन्हा एकदा डावखरे कुटुंबाशी असलेलं जुनं नातं कायम ठेवलं आहे. हिवरे सहकारी सोसायटीच्या माध्यमातून आमदार अॅड. निरंजन डावखरे यांची मतदार प्रतिनिधी म्हणून एकमतानं निवड करण्यात आली. दिवंगत वसंतराव डावखरे यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव निरंजन डावखरे यांना प्रतिनिधी करण्याचा निर्णय घेत गावानं ही परंपरा पुढं नेली आहे.
हिवरे गावाशी डावखरे कुटुंबाचं नातं राजकारणाच्या पलीकडचं आहे. दिवंगत वसंतराव डावखरे यांनी 1984 च्या सुमारास याच गावच्या सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुढं 1986 मध्ये ते ठाणे महापालिकेचे नगरसेवक, तर 1987 मध्ये ठाण्याचे महापौर झाले. 1992 पासून सलग 5 वेळा विधान परिषदेवर निवडून आलेल्या वसंतराव डावखरेंनी तब्बल 18 वर्षे विधान परिषदेचे उपसभापती म्हणून जबाबदारी सांभाळली.
डावखरे कुटुंबात फूट, निरंजन डावखरेंच्या मोठ्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
वडिलांनंतर निरंजन डावखरेंनीही हिवरे गावाशी असलेली नाळ कायम ठेवली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विधान परिषदेवर गेलेल्या निरंजन डावखरेंना जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी गावानं एकमुखानं मतदार प्रतिनिधी म्हणून निवडलं. त्यामुळे डावखरे कुटुंब आणि हिवरे गाव यांच्यातील जुना स्नेह सहकारी बँकेच्या निवडणुकीतही कायम असल्याचं या निर्णयातून स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील चुरस वाढल्यानं अनेक गावांमध्ये मतदार प्रतिनिधी निवडीचे ठराव पोलिस बंदोबस्तात केले जात आहेत. कासारी येथे ठरावाच्या कारणावरून राजेंद्र काकडे यांना मारहाण झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं काही गावांनी पोलिस बंदोबस्त घेऊन ठराव केले. शिरूरच्या राजकारणात प्रभाव राहिलेल्या दिवंगत माजी खासदार बापूसाहेब थिटे यांच्या केंदूर गावातही बन्सीलाल कांताराम पऱ्हाड यांच्या नावाचा एकमुखी ठराव झाला. हिवरे आणि केंदूर येथे ठराव शांततेत झाल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.