अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; रिलायन्स पॉवरची 2,032 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त
ED Action Against Anil Ambani: परकीय चलन नियमांच्या उल्लंघनाच्या संशयातून ईडीने अनिल अंबानींची 2,032.81 कोटींची मालमत्ता जप्त केली.
ED Action Against Anil Ambani’s Reliance Power; Assets Worth 2,032 Crore Seized: उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. रिलायन्स पॉवर लिमिटेडची 2,032.81 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. परदेशातील आर्थिक व्यवहारांमध्ये परकीय चलनविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
अनिल अंबानी यांच्या समूहाशी संबंधित काही आर्थिक व्यवहारांची ईडी चौकशी करत आहे. तपास यंत्रणेच्या आरोपानुसार, परदेशातील कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्यात आले. त्यानंतर या पैशांचा वापर इतर कंपन्यांना कर्ज देण्यासाठी करण्यात आला. हे व्यवहार करताना भारतीय नियमांचे पालन झाले होते का, याचा तपास सुरू आहे.
ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स (BVI), केमन आयलंड्स आणि सिंगापूरमधील काही कंपन्यांच्या व्यवहारांचीही तपासणी केली जात आहे. या कंपन्यांवर अनिल अंबानी यांच्या समूहाचे नियंत्रण होते का आणि त्यांच्यामार्फत पैशांची देवाणघेवाण कशी झाली, याची माहिती घेतली जात आहे.
परदेशात पैसे कसे गेले?
2006 मध्ये रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस लिमिटेडने परकीय चलन परिवर्तनीय रोख्यांच्या (FCCB) माध्यमातून 300 दशलक्ष डॉलर उभे केले होते. त्यातील 275 दशलक्ष डॉलर सिंगापूरमधील उपकंपनीत गुंतवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर या पैशांतून ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्समधील कंपन्यांना कर्ज देण्यात आल्याचे सांगितले जाते.
SIR विरोधात राहुल गांधींची याचिका दाखल; सर्वोच्च न्यायालयात 26 ऑक्टोबरला सुनावणीची शक्यता
या पैशांचा वापर नेमका कशासाठी झाला, कर्जाची परतफेड झाली का आणि व्यवहारांमध्ये नियमांचे पालन झाले का, याचा तपास ईडी करत आहे. मॉरिशसमधील काही संस्थांच्या माध्यमातून पैसे भारतात परत आणले गेले का, याचीही चौकशी सुरू आहे.
2,032 कोटींची मालमत्ता का जप्त केली?
परदेशात नियमबाह्य पद्धतीने पैसा ठेवल्याचा संशय असल्यास, त्या रकमेच्या सममूल्याची भारतातील मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे. याच तरतुदीनुसार परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (FEMA) कलम 37A अंतर्गत ईडीने ही कारवाई केली आहे.
युपीतील सौरभ राजपूत हत्याकांडात कोर्टाचा मोठा निर्णय! मुस्कानसह प्रियकर साहिलला फाशीची शिक्षा
या कारवाईत रिलायन्स पॉवरच्या बँक खात्यातील रक्कम आणि सासन पॉवर लिमिटेडमधील भागीदारीचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
याआधीही ईडीची कारवाई
अनिल अंबानी यांच्या समूहाशी संबंधित इतर आर्थिक व्यवहारांच्या प्रकरणांतही ईडीने कारवाई केली आहे. यापूर्वी समूहाशी संबंधित 9 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. नोव्हेंबर 2025 मध्येही रिलायन्स समूहाशी संबंधित मालमत्तांवर कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान, मालमत्ता जप्त केल्याचा अर्थ अनिल अंबानींवर आरोप सिद्ध झाले आहेत, असा होत नाही. परदेशातील आर्थिक व्यवहारांमध्ये नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचा तपास सुरू असून त्यातून काय निष्पन्न होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.