वादळी पावसात अडकले एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
सुदैवाने वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले अधिकारी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.
Eknath Shinde’s helicopter gets stuck in heavy rain : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे जात असताना वादळी हवामानाचा फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले अधिकारी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कल्याण-मुरबाड परिसरातील एका लग्न समारंभासाठी रवाना झाले होते.
बापगाव परिसरातील हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र मुरबाड परिसरात अचानक वादळी वारे आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली. हवामान अचानक बिघडल्याने हेलिकॉप्टर काही काळ वादळात अडकले होते. त्यावेळी वैमानिकाने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर सुरक्षितपणे वादळातून बाहेर काढले. खराब हवामान आणि कमी झालेली दृश्यमानता लक्षात घेता पुढील प्रवास टाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हेलिकॉप्टर मुंबईतील जुहू हेलिपॅडकडे वळवण्यात आले आणि तेथे सुरक्षित लँडिंग करण्यात आले.
या घटनेनंतर प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, बापगाव हेलिपॅडवर उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, हवामानामुळे दौरा रद्द झाल्यानंतर हा बंदोबस्त हटवण्यात आला. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. ठाणे जिल्ह्यासह मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पावसाच्या सारी कोसळत आहेत. मुरबाडजवळील वांगणी परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. वांगणी पश्चिमेकडील श्रीनगर भागात एका घराचा पत्रा उडून थेट हायटेंशन वीजवाहिनीत अडकल्याची घटना घडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्पार्किंग सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची एकाच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. स्थानिकांनी प्रशासनाकडे तत्काळ वीजपुरवठा खंडित करून धोका टाळण्याची मागणी केली आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर व्हीआयपी हवाई सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. त्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला आलेल्या अडचणीमुळे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.