Sushilkumar Shinde Birthday : अन् शेती करायला गेलेल्या शिंदेंनी मुख्यमंत्री, गृहमंत्रीपदाला गवसणी घातली

Sushilkumar Shinde Birthday : अन् शेती करायला गेलेल्या शिंदेंनी मुख्यमंत्री, गृहमंत्रीपदाला गवसणी घातली

सुशीलकुमार शिंदे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे केंद्रीय गृहमंत्री. अठराविश्व दारिद्र्य, जातीभेद अशा अडथळ्यांवर मात करत, प्रसंगी रात्रशाळेत जाऊन त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतरची त्यांची पोलीस खात्यातील नोकरी आणि त्यांच्या राजकारणाची सुरुवात या गोष्टीही अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतून गेल्या. कदाचित याच सगळ्यामुळे तळातून वरच्या स्थानापर्यंत पोहचलेल्या काही मोजक्या राजकीय नेत्यांच्या यादीमध्ये शिंदेंचा नंबर वरचा लागतो. (Ex. Chief Minister Sushilkumar Shinde B’day Special Story)

शिंदे यांचा अडथळ्याचा आणि त्यावर मात करुन पुन्हा भरारी घेतल्याचा असाच एक किस्सा म्हणजे ते राजकीय पायऱ्या चढत असताना देखील त्यांना शेती करायाला जावं लागलं होतं. मात्र तिथून त्यांनी पुन्हा राजकारणाची सुरुवात करुन थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदापर्यंत मजल मारली.

1978 चे वर्ष. महाराष्ट्रात रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांचे सरकार सत्तेत आले होते. मात्र हे आघाडी सरकार अल्पावधीतच कोसळले. कारण ठरले ते शरद पवार आणि त्यांच्या सोबतच्या 40 आमदारांचे बंड. याच 40 आमदारांमध्ये सुशीलकुमार शिंदेही होते. यानंतर जनता पक्षाच्या पाठिंब्यावर पुलोद अर्थात पुरोगामी लोक दलाची स्थापना करुन शरद पवार मुख्यमंत्री झाले, तर या सरकारमध्ये सुशील कुमार शिंदे कॅबिनेट मंत्री झाले. जवळपास तीन वर्षे हे सरकार सत्तेत राहिले. महाराष्ट्रात पुलोदचा प्रयोग यशस्वी झाल्याची भावना व्यक्त केली जात होती.

मात्र 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. त्यांनी पवारांचं सरकार रातोरात विसर्जित केलं. पाठोपाठ जनता पक्षही फुटला. पवारांच्या समाजवादी काँग्रेसची वाताहत झाली. राजकारणाला लागलेली उतरती कळा पाहून अनेक नेत्यांनी पुन्हा एकदा परतीचा विचार सुरु केला. सुशीलकुमार शिंदेंनी देखील इंदिरा गांधींकडे परतण्याचा निर्णय घेतला. इंदिरा गांधी सत्तेत आल्यानंतर संजय गांधींचे विश्वासू असलेले बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री बनले होते.

मात्र या मंत्रिमंडळापासून त्यांनी सुशीलकुमार शिंदेंना लांबच ठेवले. पवारांची साथ सोडली तरी मैत्री कायम असल्याचा आणि काँग्रेसचं सरकार पाडल्याचा राग त्यांच्या मनात असावा असा अंदाज जाणकार व्यक्त करतात. पण यामुळे शिंदे 4 वर्षे राजकीय विजनवासात गेले. असं म्हणतात की त्यांनी पवारांच्याच सांगण्यावरुन शेतीही सुरु केली. पुढे 1983 साली वसंतदादा पाटील पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले.

त्यावेळी वसंतदादांनीच त्यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या शिंदे यांना पुन्हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले. शिंदेंकडे थेट अर्थखात्याची जबाबदारी आली. त्यानंतर शिंदेंनी मागे वळून पाहिले नाही. विविध खात्यांचे मंत्रिपद, दिल्लीतील राजकारण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, आंध्रप्रदेशचे राज्यपाल आणि त्यानंतर केंद्रात उर्जामंत्री, गृहमंत्री अशा विविध मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पार पाडल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube