ब्रेकिंग : तुकाराम मुंढेंची थेट हायकोर्टावर कारवाई; कॅन्टीन बंद करण्याची दिली नोटीस
FDA कडून महाराष्ट्रात नामांकित हॉटेलवर कारवाईचा सुरू आहे. आता अन्न व औषध प्रशासनाचा मोर्चा सरकारी आस्थापनाकडे वळवला आहे.
FDA Issue Notice For Closed Mumbai HC Canteen : राज्यात एकीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून विविध ठिकाणांची तपासणी सुरू असताना आता तुकाराम मुंढेंच्या विभागाने थेट मुंबई उच्च न्यायालयातील स्टाफ कॅन्टीन बंद करण्याची नोटीस दिली आहे. अन्न सुरक्षांच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.
मुंढेंनी पदभार घेतल्यापासून कारवााईचा धडका
मुंढे FDA च्या आयुक्त पदावर आल्यापासून राज्यभरातील अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या आस्थापनांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईनंतर अनेक आस्थापनांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. यावरील सुनावणीवेळी कोर्टातील कॅन्टीनमध्येसुद्धा FDA तपासणी केली होती. त्यावेळी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले होते. हायकोर्टातील कँटीन हे एफएसएसआय परवान्याशिवाय चालवले जात होते. त्यामुळे नियमांचे पालन करत नसल्याचे म्हणत अन्न व औषध प्रशासनाने कँटीन चालकाला व्यवसाय थांबवण्याचे आदेश दिले. अन्न व औषध प्रशासनाने कोर्टाच्या आवारातील 3 कँटीनला नोटीस दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून कँटीनवर कारवाई केल्याने वकील वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
दुपारपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश
दुसरीकडे मंत्रालयातील कँटीनमध्ये साधा कीटकही आढळला नसल्याचं आज एफडीएने कोर्टात म्हटलं होतं. त्यावर कोर्टाने एफडीएची चांगलीच कान उघाडणी केली आहे. मंत्रालयाच्या कँटीनमध्ये कीटक नाही म्हणणे हस्यास्पद आहे, असं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने आज दुपारी 3 वाजेपर्यंत मंत्रालयातील कँटीनबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी मंत्रालयाच्या कँटीनमध्ये एकही कीटक नसल्याचं म्हणणं हस्यास्पद असल्याचे म्हणत न्यायालयाने एवढ्या मोठ्या कँटीनमध्ये कीटक असूच शकत नाही का? असा सवाल केला. तसेच फक्त खासगी अस्थापनांनाच टार्गेट करू नका. सर्वांना समान वागणूक द्या, अशी समजच कोर्टाने एफडीएला दिली आहे.
मंत्रालयात स्वच्छतेसाठी धावपळ
कोर्टाने कँटीन तपासणीचे आदेश देताच मंत्रालयातील कँटीनमध्ये स्वच्छता करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांना कोणताही दोष आढळणार नाही याची काळजी घेतली जात आहे. किचनपासून ते जेवणाच्या टेबलपर्यंत स्वच्छता केली जात आहे.