Anantrao Thopte Passes Away : मोठी बातमी! ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन
Anantrao Thopte Passes Away : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे माजी शिक्षण मंत्री अनंतराव थोपटे ( वय 93) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.
Anantrao Thopte Passes Away : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे माजी शिक्षण मंत्री अनंतराव थोपटे ( वय 93) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. गेले महिनाभर त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सायंकाळी 7:30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती समोर येत आहे.
अनंतराव थोपटे (Anantrao Thopte Passes Away) यांनी भोर विधानसभा मतदारसंघातून (Bhor Assembly Constituency) सलग अनेक वेळा विजय मिळवून त्यांनी काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला निर्माण केला होता. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात सुमारे 14 वर्षे विविध खात्यांचे मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. पुणे जिल्ह्यात दीर्घकाळ “भोर म्हणजे थोपटे आणि थोपटे म्हणजे भोर” अशी राजकीय ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने या भागात मजबूत संघटन उभी केली.
दुग्धविकास, पशुसंवर्धन, उच्च व तंत्रशिक्षण, पुनर्वसन रोजगार हमी योजना, परिवहन, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, संसदीय कार्य, विधिमंडळ कामकाजसह अनेक खात्यांच्या कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला. तसेच त्यांनी 1981-82 दरम्यान पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक म्हणूनही काम पाहिले होते.
त्यांचे पुत्र संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी 2009, 2014 आणि 2019 मध्ये भोर मतदारसंघातून विजय मिळवत वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेला होता. मात्र विधानसभा निवडणूक 2024 नंतर संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
राजकीय कारकीर्द
1980 ते 1999 या काळात त्यांनी भोर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
2004 मध्ये त्यांनी पुन्हा भोर मतदारसंघ जिंकून विधानसभेत पुनरागमन केले.
महाराष्ट्रातील विविध काँग्रेस सरकारांमध्ये त्यांनी सुमारे 14 वर्षे मंत्री म्हणून काम केले.
शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित धोरणांमध्ये भूमिका बजावली.
राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “अनंतराव थोपटे यांनी दीर्घकाळ भोर मतदारसंघाचे प्रभावी नेतृत्व केले. सहा वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. राज्य मंत्रिमंडळात विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी ग्रामीण विकास, शेती, पायाभूत सुविधा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सातत्याने कार्य केले. त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांनी लोकसंग्रह, साधेपणा आणि जनसेवा ही मूल्ये जपली.
ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे व्यक्तिमत्त्व हे संयमी, सर्वसमावेशक आणि लोकहिताला प्राधान्य देणारे होते. विविध राजकीय पक्षांतील नेत्यांशी त्यांनी जपलेले स्नेहसंबंध आणि राजकारणातील सभ्य परंपरा कायम स्मरणात राहतील.
त्यांच्या निधनाने केवळ भोर तालुक्याचेच नव्हे, तर पुणे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. थोपटे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना करते, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 11 उमेदवारांची घोषणा