ऑटो रिक्षा युनियन ते भाजप प्रदेशाध्यक्ष; नितीन गडकरींनी सांगितला रविंद्र चव्हाणांचा ‘तो’ किस्सा

Nitin Gadkari On Ravindra Chavan : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजपला आज नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. वरळी येथे झालेल्या अधिवेशनात राज्याचे माजी मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. वरळी येथे झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह किरण रिजिजू (Kiren Rijiju) , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह (Devendra Fadnavis) प्रमुख भाजप (BJP) नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत डोंबिवली मतदारसंघातून रविंद्र चव्हाण यांना तिकीट देण्यास का? उशीर झाला याबाबत खुलासा केला आहे.
या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आज आपल्या पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्या पक्षाचा अध्यक्ष झाला आहे. रविंद्र चव्हाण यांचे आई- वडील आमदार-खासदार नव्हते. तसेच त्यांच्याकडे कोणताही मोठा उद्योग व्यवसाय नव्हता. 2009 साली मी जेव्हा भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. तेव्हा विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात शेवटी डोंबिवली मतदारसंघाचा निर्णय झाला होता. या मतदारसंघात तिकीट वाटपावरुन बराच वाद निर्माण झाला होता. पण त्यावेळी मला विश्वास होता आपण ज्या व्यक्तीला तिकीट देणार आहे तो भविष्यात महाराष्ट्राचा मोठा नेता होणार आहे. असं या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
मी अध्यक्ष असताना डोंबिवलीमध्ये गेलो होतो तेव्हा रविंद्र चव्हाण ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ऑटो रिक्षाबरोबर माझी मोठी यात्रा काढली होती. पण ऑटो रिक्षाशी महाराष्ट्रा भाजपचा काय नातं आहे हे मला माहिती नाही कारण जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपमध्ये आणले तेव्हा ते ऑटो रिक्षा चालक होते. ऑटो रिक्षा चालक ते ऑटो युनियनचा नेता असा हा दहा वर्षाचा प्रवास आहे. भाजप कार्यकर्त्यांची पार्टी आहे. या पक्षात ज्या कार्यकर्त्यांनी शून्यापासून सुरुवात केली तो या पार्टीचा अध्यक्ष होऊ शकतो असं देखील नितीन गडकरी म्हणाले.
जाणून घ्या रविंद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास
-2002 मध्ये डोंबिवलीत भाजप मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड
-2005 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक ( डोंबिवलीच्या सावरकर रोड प्रभाग)
-2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये सलग चार वेळा आमदार
– 2016 मध्ये राज्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात संधी
– 2019 मध्ये भाजप सरचिटणीस म्हणून निवड
-एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री
– पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपद
-2024 मध्ये भाजपचे प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती