एवरेस्टच्या हिंगाच्या विक्रीवर ‘FSSAI’कडून तातडीने बंदी; तपासणीत ठरवून दिलेल्या निकषांवर अपयश

एफएसएसएआयच्या तपासणीत संमिश्र हिंगेतील 'अल्कोहोलमध्ये विरघळणारा अर्क' या घटकाचं प्रमाण निर्धारित निकषांपेक्षा कमी असल्याचं आढळलं.

News Photo   2026 08 29T183426.479

खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणाऱ्या भारतीय (FSSAI) अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) एवरेस्ट फूड प्रॉडक्ट्सच्या संमिश्र हिंगाच्या विक्रीवर पुढील आदेशापर्यंत तातडीने बंदी घातली आहे. कंपनीच्या संमिश्र हिंगाच्या सर्व प्रकारांना हा आदेश लागू राहणार आहे. सरकारी प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये काही नमुने चुकीचे लेबल असलेले आणि निर्धारित दर्जापेक्षा कमी गुणवत्तेचे आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याच प्रकरणात जुनी हिंग उत्पादक कंपनी लालजी गोधू अँड कंपनीविरोधातही विक्री आणि उत्पादनावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

एफएसएसएआयच्या तपासणीत संमिश्र हिंगेतील ‘अल्कोहोलमध्ये विरघळणारा अर्क’ या घटकाचे प्रमाण निर्धारित निकषांपेक्षा कमी असल्याचे आढळले. नियमानुसार संमिश्र हिंगेत या घटकाचे प्रमाण किमान 5 टक्के असणे आवश्यक आहे. मात्र, एवरेस्टच्या एका नमुन्यात हे प्रमाण शून्य टक्के, पिवळ्या हिंगेच्या नमुन्यात 3.29 टक्के, तर काळ्या हिंगेच्या नमुन्यात 4.4 टक्के आढळले. संमिश्र हिंगेत अस्सल हिंगेसोबत पीठ, स्टार्च आणि अन्य घटकांचा वापर केला जातो. त्यामुळे अल्कोहोलमध्ये विरघळणाऱ्या अर्काचे प्रमाण हे उत्पादनातील अस्सल हिंगेचे प्रमाण दर्शविणारा महत्त्वाचा निकष मानला जातो.

एवरेस्टच्या इतर काही उत्पादनांबाबतही यापूर्वी तक्रारी आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे एफएसएसएआयच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. चिकन मसाला, गरम मसाला आणि अंडा करी पावडरच्या लेबलिंगमध्ये त्रुटी आढळल्याचा उल्लेख आहे. विविध ठिकाणांहून घेण्यात आलेल्या संमिश्र हिंगेच्या नमुन्यांमध्ये वारंवार समान स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्या असून, अल्कोहोलमध्ये विरघळणाऱ्या अर्काचे प्रमाण सातत्याने 5 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे तपासणीत स्पष्ट झालं. कंपनीला या प्रकरणी सुधारात्मक कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लालजी गोधू अँड कंपनीच्या संमिश्र हिंगेच्या नमुन्यांमध्येही निर्धारित गुणवत्ता निकषांचे पालन झाले नसल्याचे आढळले. तसेच संमिश्र हिंगेच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या हिंगेच्या विविध प्रकारांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक स्टार्च आढळला. ही त्रुटी वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये सातत्याने आढळल्याने कंपनीच्या संमिश्र हिंगेचे उत्पादन आणि विक्री पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आली आहे. दरम्यान, 2024 मध्ये एवरेस्टसह काही मसाला उत्पादकांच्या उत्पादनांमध्ये ‘इथिलीन ऑक्साइड’च्या वापराबाबत हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, सध्याची कारवाई हिंगेच्या गुणवत्ता निकषांशी संबंधित असून, त्या प्रकरणापेक्षा वेगळी आहे.

follow us