आत्महत्या नाही खूनच! गौरीच्या वडिलांनी जावई अनंतविषयी सांगितली धकाकदायक माहिती
कुणी काहीही म्हटलं तरी माझ्या मुलीचा हा खून आहे. तसंच, जर माझ्या मुलीचा खून नाही तर आरोपी फरार का झाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
माझ्या मुलीला मारलं नाही तर मग अनंत गर्जे फरार का झाला? असा प्रश्न उपस्थित करत ही आत्महत्या नसून हा खून आहे. तीच्या मानेवर मारहाणीच्या खुना आहेत असाही थेट आरोप गौरी (Garje) पालवेच्या कुटुंबाने केला आहे. त्याचबरोबर काही दिसांपूर्वी आंबेजोगाई येथील मुलीसोबत अनंत गर्जे यांचे संबंध होते. त्यावेळी मुलीचा गर्भपात करण्यात आला होता त्याची कागदपत्र गौरीला सापडले असा धक्कादायक खुलासाही गौरीचे वडील अशोक पालवे यांनी केला आहे.
गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी गौरीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी याआधीही केली होती. आज या प्रकरणावर बोलताना गौरी गर्जे यांच्या वडिलांनी आरोप केला की, गौरीने गळफास घेतला असता, तर तिच्या गळ्यावर तशा खुणा असत्या. तिच्या छातीवर मारहाणीच्या खुणा होत्या, तिच्या डोक्याला मार लागलेला होता. मारहाणीत तिचा मृत्यू झाला असा दावा त्यांनी केला आहे. त्याचबरोबर हे सगळ तपास अधिकारी लपवत आहेत असंही तीचे वडील म्हणाले आहेत.
डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी रात्री उशीरा पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक
माझ्या मुलीला मारण्यात आलं आहे. ती आत्महत्या करू शकत नाही, ती खूप स्ट्राँग होती. नातेवाईक यायच्या आधी पंचनामा का करण्यात आला? तुम्ही तुमच्या बहिणीला फोन का केले? तुम्ही यात दोषी नाहीत तर फरार का झालेत याचं उत्तर द्यावं असंही गौरी यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्याशी आपलं बोलण झालं असून या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हावी असं त्या म्हणाल्या असंल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
गौरीच्या कुटुंबियांनी तिच्या मृत्यूनंतर अनेक दावे केले आहेत. तिच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद आणि छळ हे कारण असल्याचं बोललं जात आहे. अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय गौरी यांना होता. यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. अनंत गर्जे मुलींसोबत चॅटिंग करत असल्याचं गौरीच्या लक्षात आलं होते. तिने माफ केल्यानंतरही हा प्रकार सुरूच असल्याने दोघांमध्ये कडाक्याची भांडणे झाली. अनंत गर्जे गौरीला खूप टॉर्चर करत होते, असा आरोप गौरीच्या मामांनीही केला होता.
