बाटली फेकली अन् नको ती भाषा वापरली; वरळीतील वायरल राड्यावर गिरीश महाजनांचा मोठा खुलासा!
Girish Mahajan On Viral Video : लोकसभेत महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्याने संपूर्ण देशात सत्ताधारी भाजपने विरोधकांविरोधात
Girish Mahajan On Viral Video : लोकसभेत महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्याने संपूर्ण देशात सत्ताधारी भाजपने विरोधकांविरोधात मोर्चे काढत आंदोलन करण्याची रणनीती आखली आहे. काल मुंबईतील वरळीत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि विरोधकांविरोधात मोर्चा काढला होता. मात्र या मोर्च्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झाल्याने एका संतप्त महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या घटनेवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले की, काल हजारो महिला मुंबईसह (Mumbai) देशभरात रस्त्यावर उतरल्या होत्या. काँग्रेसने महिला आरक्षण विरोधात मतदान केले व बिल पास होऊ दिले नाही. काल ट्राफिक कोंडी झाली होती. सर्वच पक्ष मोर्चे काढतात. कालच्या मोर्चात एक भगिनी आल्या, त्या वाट्टेल त्या बोलल्या. पोलिसांना तक्रार करायची होती. मी बाईट देताना त्या आल्या. पोलिसांनी त्यांना समजावले पण त्या नको त्या भाषेत बोलल्या. महिला पोलीस आल्या. आम्ही संयमाची भाषा वापरली. त्यांनी बाटली देखील फेकून मारली.
आम्ही पोलिसांना सांगितले, चिडू नका, त्यांना हवे ते बोलू द्या. महिलांच्या आरक्षणासाठीच तो मोर्चा होता. यापुढे काळजी घेऊ. मोर्चा व आंदोलनावेळी काळजी घेतली जाईल. त्यांना त्यांचा राग वेगळ्या भाषेत मांडता आला असता. आम्ही रितसर परवानगी घेऊन मोर्चा काढला होता. सायंकाळची वेळ होती. रात्री तर मोर्चा निघू शकत नाही. मार्ग ठरलेला होता. नियोजन ठरलेला होता. बाटली फेकून मारते हे योग्य नाही. त्यांचा राग फार अनावर झाला होता. महिला आरक्षणासाठीच हा मोर्चा होता. तुम्ही तक्रार करू शकल्या असत्या. जी भाषा वापरली ती संयुक्तिक नव्हती. त्यांनी बाटली फेकून मारली. सौम्य भाषेत ही राग व्यक्त करता आला असता असं माध्यमांशी बोलतान गिरीश महाजन म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
वरळीत मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली महायुतीकडून महिला जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्च्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झाली होती. त्यामुळे एका संतप्त महिलेने गिरीश महाजन यांना जाब विचारात ट्रॅफिक हटवण्याची मागणी केली. तुमचं हे काय चाललं आहे? इथून निघून जा असं म्हणत महिलेने गिरीश महाजन यांना झापलं.