Video : अॅसिडिटी समजून दुर्लक्ष करताय? हृदयविकाराच्या लक्षणांबाबत डॉ. इब्राहिम पटेल यांची महत्वाची माहिती
Heart Disease Symptoms and Diagnosis : हृदयविकाराची लक्षणं अनेकदा अॅसिडिटी समजून दुर्लक्षित केली जातात, पण वेळेवर तपणी करावी.
Heart Disease Symptoms and Diagnosis : तुम्ही जेव्हा शिक्षण घेत होता, म्हणजे 15 ते 20 वर्षांपूर्वीच्या शस्त्रक्रिया आणि आत्ताच्या शस्त्रक्रिया यामध्ये किती फरक पडला आहे, असं विचारलं असता डॉक्टर पटेल म्हणाले, सध्या काय करायचं हे सगळ्यांना माहिती आहे, पण कुठं काय करायचं नाही, हे माहिती असणंही आवश्यक आहे. (Pune) दरम्यान, काहीतरी अचानक दुखल्यावर डॉक्टरांकडं जातो, तेव्हा डॉक्टर तात्काळ शस्त्रक्रियेचा सल्ला देतात, असं विचारलं असता डॉक्टर म्हणाले, खूप मोठ्या प्रमाणात जर हृदय दुखत असेल, तर डॉक्टर घाई करतातच. त्याचवेळी बायपास ही घाईने होत नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.
वेगवेगळ्या डॉक्टरांचं ओपिनियन घ्यावं का, याबद्दल विचारलं असता डॉक्टरांनी सांगितलं, वेगवेगळ्या डॉक्टरांचा सल्ला घेणं चांगलं आहे. पण लोक डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. जे डॉक्टर नाहीत, त्यांचा सल्ला घेतात किंवा गुगलवर माहिती घेतात. गुगलवर माहिती चुकीची मिळत नाही, पण जी माहिती मिळते, ती समजून घेण्याची क्षमता लोकांमध्ये नसल्याने अडचण होते, असं निरीक्षणही डॉक्टरांनी नोंदवलं आहे. यावेळी कोलेस्ट्रॉल वाढलं तर हृदयविकाराचा धोका वाढतो का, असं विचारलं असता ते म्हणाले, पूर्वी हा धोका जास्त होता; सध्या तो तितका नाही.
फक्त औषधांवर ब्लॉकेज दुरुस्त होतात का, यावर बोलताना डॉक्टर म्हणाले, ब्लॉकेज हे किती प्रमाणात आहेत, यावर ते ठरतं. ब्लॉकेज 50 टक्क्यांवर असेल, तर काही करण्याची गरज नाही. ते पुढं गेलं म्हणजे 65 टक्क्यांवर गेलं, तर औषध काही काम करत नाही. यामध्ये कोणतंही औषध 50 टक्क्यांपर्यंतच काम करतं. आणि हे ब्लॉकेज दुरुस्त होतच नाही. पण जो काही 50 टक्के भाग ब्लॉकेजपासून वाचलेला आहे, त्याला वाचवण्याचं काम औषधं करतात. यामध्ये तुमचे व्यसन कमी केले, तर त्यावर चांगला परिणाम होतो. पण 70 टक्क्यांवर गेलं, तर हे बदल होत नाहीत. त्याला शस्त्रक्रियाच करावी लागते.
हृदयविकार होण्यापूर्वी किती काळ अगोदर त्याची लक्षणं जाणवू शकतात, यावर बोलताना डॉक्टर म्हणाले, साखर असलेल्या व्यक्तीला हृदयविकाराची लक्षणं जाणवत नाहीत आणि तो अचानक येतो. याला आपण सायलेंट अटॅक म्हणतो. अनेकदा आपल्याला अॅसिडिटी असल्यासारखं वाटतं. त्यामुळं असं काही वाटत असेल, तर हृदयाचं एकदा चेकअप केलं पाहिजे. प्रत्येक टेस्ट पॉझिटिव्हच आली पाहिजे, असं नाही. ती आरोग्याची तपासणी आहे. त्यामुळं तपासणी केली पाहिजे. दरम्यान, कोरोनानंतर हृदयविकाराचं प्रमाण वाढलं आहे का, यावर बोलताना डॉक्टर म्हणाले, फक्त कोरोनामुळं हे होत आहे, असं नाही. ते सुरुवातीपासून आलेल्या आजारांमुळं होतं. फक्त कोरोनामुळं प्रमाण वाढलं, इतकाच फरक झाल्याचंही ते म्हणाले.
सध्या जिममध्ये किंवा ऑफिसमध्ये अनेकांना अचानक हृदयविकाराचा झटका येतो. तर यावेळी त्यांना काहीच लक्षणं जाणवत नाहीत का, यावर बोलताना डॉक्टर म्हणाले, या लोकांना बरंच काही जाणवलेलं असतं; पण त्यांनी वारंवार त्याकडं दुर्लक्ष केलेलं असतं. प्रत्येकाला स्वत:ला माहिती आहे. अॅसिडिटी किंवा इतर काही आहे, असं म्हणून ते टाळतात. पण हे सगळं न करता सरळ तपासणी केली पाहिजे, असंही डॉक्टर पटेल यांनी यावेळी म्हटलं आहे. तसंच, जिम करणं किंवा व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. रोज व्यायाम करणाऱ्यांना रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळं जाणवतं. त्यामुळं असं काही जाणवलं, तर तपासणी आवश्यक आहे.