पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे; विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज, ताशी 60 किमी वेगाने वारे वाहणार

विदर्भातील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमात हवामानाचा त्रास वाढणार आहे.

Untitled Design 6

Heavy rain with lightning expected : महाराष्ट्रात एकीकडे कडक उन्हाचा तडाखा वाढत असतानाच दुसरीकडे अवकाळी पावसाने देखील नागरिकांची चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून आज 9 मे रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः विदर्भातील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमात हवामानाचा त्रास वाढणार आहे.

मुंबईसह संपूर्ण उत्तर कोकणात उकाड्याची तीव्रता कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून दक्षिण कोकणात पुढील 48 तास अवकाळी पावसाचा धोका कायम असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या भागात कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून हवेत आर्दतेच प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना उकाडा आणि दमात वातावरणाचा मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

मध्य महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचंही शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तापमान 37 ते 40 अंशांच्या दरम्यान राहणार असल्याने उष्णतेचा देखील त्रास कायम राहील.

उत्तर महाराष्ट्रात मात्र पावसापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत हवामान प्रामुख्याने उष्ण आणि कोरडे राहणार असून पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. या भागात कमल तापमान 38 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं, तर किमान तापमान 22 ते 26 अंशांच्या दरम्यान राहील. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक तीव्र जाणवण्याची शक्यता आहे.

गुन्हेगारांची यादी वाचावी तशी कीर्तनकारांची नावे घेतली, आमदार संग्राम जगतापांचं संग्राम भंडारेंना उघड समर्थन

मराठवाड्यात देखील उन्हाचा पार चढलेला असतानाच काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गडगडाटी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत राहू शकतो. कमाल तापमान 38 ते 43 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

विदर्भाची परिस्थिती अधिक गंभीर बनताना दिसत आहे. गडचिरोली वगळता विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर, अमरावतीसह इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तापमान 39 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते.

एकूणच पुढील 2 दिवस राज्यातील हवामान अस्थिर राहणार असून अनेक भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील तब्बल 22 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघात आणि बदलत्या हवामानापासून स्वतःची काळजी घ्यावी, शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती खबरदारी घ्यावी आणि मच्छीमारांनी स्थानिक प्रशासन व हवामान विभागाच्या सूचनांकडे विशेष लक्ष द्यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

follow us