गुप्त ऑपरेशनचा थरार! रात्रीच्या अंधारात आखलेल्या ऑपरेशनमध्ये भोंदू बाबा खरातला पोलिसांनी कसा गाठलं?
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एका मुलाखतीत अशोक खरातवर झालेल्या कारवाईमागचा थरार उलगडून सांगितला.
How did the police reach Bhondu Baba Kharat? : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या तथाकथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि अंधश्रद्धेच्या आडून शोषण केल्याच्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून सध्या या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून सखोल चौकशी सुरू आहे. खरातच्या कार्यालयातील महिलांच्या शोषणाचे कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अनेक महत्वाचे मुद्दे तपासले जात आहेत. खरातच्या या कृत्यांमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का, त्याला कोणाचा राजकीय किंवा आर्थिक पाठिंबा होता का, तसेच त्याचे आर्थिक व्यवहार नेमके कोणाकोणाशी जोडलेले आहेत, याचा बारकाईने तपास सुरू आहे. या सर्व मुद्द्यांची उकल करण्यासाठी तपास यंत्रणा विविध अंगांनी चौकशी करत आहे.
दरम्यान, नाशिकच्या सत्र न्यायालयाने आरोपी अशोक खरात याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे तपास अधिक गतीने पुढे नेण्यासाठी पोलिसांना वेळ मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एका मुलाखतीत या संपूर्ण कारवाईमागचा थरार उलगडून सांगितला. संदीप कर्णिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातला 17 मार्च रोजी अटक करण्यात आली. मासिक गुन्हे शाखा क्रमांक 1 ने या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता.
मात्र, आरोपी अत्यंत प्रभावशाली आणि त्याचे जाळे विविध क्षेत्रांमध्ये पसरलेले असल्यामुळे त्याला अटक करण्याचे ऑपरेशन अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले होते. पोलिसांनी आखलेल्या या ऑपरेशनमध्ये अत्यंत शिताफीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करण्यात आली. आरोपीला कोणतीही कल्पना न देता त्याला अटक करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. कारण जर ही माहिती आधीच लीक झाली असती, तर आरोपी पळून जाण्याची किंवा दबाव टाकण्याची शक्यता होती.
विरोधकांचा दबाव आणि पक्षांतर्गत नाराजी वाढली, अखेर रुपाली चाकणकरांनी सोडली दोन्ही पदे
यासाठी पोलिसांनी एक अनोखी युक्ती आखली. संबंधित परिसरात चोर आल्याची अफवा पसरवण्यात आली. गुंडा स्कॉडचे अधिकारी आणि त्यांच्या पथकाने या अफवेचा आधार घेत परिसरात हालचाली सुरू केल्या. या गोंधळातच पोलिसांनी थेट आरोपीच्या घरात प्रवेश केला. आपल्या घरात चोर शिरल्याची कल्पना झाल्यामुळे आरोपी सतर्क झाला, मात्र त्याला पोलिसांची कल्पना नव्हती. याचहक फायदा घेत पोलिसांनी घरातील एका खोलीत लपून बसलेल्या अशोक खरातला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला तात्काळ पोलीस ठाण्यात नेऊन अटक करण्यात आली.
कर्णिक यांनी सांगितले की, रात्री सुमारे 9 वाजल्यापासून पोलिसांचे पथक आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. त्याचे लोकेशन गुप्त माहिती आणि स्थानिक नेटवर्क यांच्या मदतीने त्याचा ठावठिकाणा निश्चित करण्यात आला. आणि एकदा कारवाई सुरू केल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत पोलिसांनी त्याला जेरबंद केले. तसेच, या संपूर्ण प्रक्रियेत सर्वप्रथम पीडित महिलेची तक्रार विश्वासात घेऊन नोंदवण्यात आली.
त्यानंतरच अटकेची प्रक्रिया राबवण्यात आली. यामुळे प्रकरणाची कायदेशीर बाजू भक्कम ठेवण्यात पोलिसांना यश आले. सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणामुळे अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.