Jitendra Awhad : गाईला मिठी कशी.., केंद्राच्या निर्णयाची आव्हाडांनी उडवली खिल्ली
ठाणे : व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी एखाद्या चौकात 8 ते 10 गाई आणून ठेवा, तिला मिठी कशी मारायची तेही सांगा, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारच्यावतीने 14 फेब्रवारी व्हॅलेंटाईन डे हा दिवस ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करण्याबाबत पत्रक काढण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर खोचक शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केलीय.
आव्हाड म्हणाले, नव्या पिढीत असणारे तरुण आणि तरुणी व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. व्हॅलेंटाईन डे म्हणजे एकमेकांच्या बरोबर असलेली मैत्री, प्रेम भावना. माझी सरकारला एक मागणी आहे. एखाद्या चौकात 8 ते 10 गाई आणून ठेवाव्यात, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
तसेच चौकातील गाईंना मिठी कशी मारायची? हे सुद्धा सांगा कारण, मागून मिठी मारली की लाथ मारेल आणि पुढून मिठी मारली तर शिंग मारेल,” असा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, व्हॅलेंटाईन डे जगभरासह देशात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. या दिवसाची आतुरतेने तरुणांकडून वाट पाहिली जाते. विशेषत: महाविद्यालयांमध्ये अनेक तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात हा दिवस साजरा करतात. अशातच केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाकडून व्हॅलेटाईन डेच्या दिवशी ‘गाईला आलिंगन दिन’ म्हणजेच गाईला मिठी मारून साजरा करावा, असं आवाहन करण्यात आलंय.
केंद्र सरकारच्या या निर्णयावर राज्यभरातील राजकीय नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्राच्या या निर्णयावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केलीय. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या निर्णयावर टीका केलीय. वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकणारे जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे.