माणुसकीच्या चिंधड्या! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; हातपाय मोडून मृतदेह ठेवला पेटीत

Husband Murdered His Wife In Shirala : मांगले येथून एक धक्कादायक तितकीच माणुकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक (Shirala ) घटना उघडकीस आली. ऐव्हडंच नाही तर संशयिताने खुनानंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राजक्ता मंगेश कांबळे (वय २८) असं मृत महिलेचं नाव आहे. खून केल्यानंतर संशयित पती मंगेश चंद्रकांत कांबळे (रा. मांगले, मूळ रा. कोकरूड) स्वतःहून पोलिसात दुपारी हजर झाला. त्यानंतर मंगेश व प्राजक्ताचा आठ वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला आहे. आरोपी मंगेशचा भाऊ नीलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षांपासून मांगले येथे वास्तव्यास आहे. मांगले- वारणानगर रस्त्यावर जोतिबा मंदिरासमोर रामचंद्र वाघ यांच्या घरात ते भाड्याने राहतात.
चार दिवसांपूर्वी मंगेश त्याची पत्नी प्राजक्ता व सहा वर्षांचा मुलगा शिवम्, तीन वर्षांची मुलगी शिवन्या मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते. आज सकाळी भाऊ नीलेश आणि आई देववाडी येथे गेले होते. दरम्यान, सकाळी दहाच्या दरम्यान पती-पत्नीत वाद झाला होता. तो वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर बाजूच्या खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत हातपाय मोडून मृतदेह घालून झाकून ठेवला अशी माहिती पोलिसांनी दिली.
कठुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात चकमक; तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, तर तीन जवानही शहीद
खोलीला बाहेरून कुलूप घालून, भाऊ नीलेश याला फोन करून ‘मी शिराळ्याला जाणार आहे, गाडी घेऊन ये’ असा निरोप दिला. भाऊ नीलेश देववाडीतून मांगलेत आल्यानंतर मंगेशने भावाकडून गाडी घेऊन तो शिराळ्याकडे निघून गेला. याचदरम्यान मंगेशचा सहा वर्षांचा मुलगा शिवम दारातच रडत होता. त्यावेळी नीलेशने त्याला समजावून ‘काय झालं, असं विचारलं. त्यावेळी सहा वर्षांच्या शिवमने मम्मी-पप्पांचं दोघांचं भांडण होऊन पप्पांनी आईला मारून खोलीत ठेवल्याचं सांगितलं.
नीलेशने देववाडी येथील बहिणीला आणि तिच्या पतीला बोलवून घेतले. मंगेशला फोन करून ‘गोरक्षनाथ मंदिराजवळच थांब आम्ही येतो’ म्हणून सांगितलं. त्यानंतर गोरक्षनाथ मंदिराजवळ जाऊन सविस्तर माहिती विचारल्यानंतर त्याने खून केल्याचं सांगितलं. त्यानंतर या तिघांनीही त्याला आम्हाला त्रास होईल, तू पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे’, असं सांगितलं. त्यानंतर तो स्वतः शिराळा पोलिसांत हजर झाला.
दुपारनंतर घटनेची माहिती मिळाल्यावर जोतिबा मंदिराशेजारी वाघ यांच्या घरासमोर लोकांनी गर्दी केली. शिराळा पोलिसांनी मयत प्राजक्ताच्या आईला व इतर नातेवाइकांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. याबाबत मयत प्राजक्ताची आई रंजना अर्जुन चांदणे (वय ४५) रा. कोकरूड यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी शिराळा येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पुढील तपासाबाबत मार्गदर्शन केलं. अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करीत आहेत.