आयटीआय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; मिळणार ‘एवढं’ विद्यावेतन

ITI Student Amravati Mandal

नागपूर : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं मोठी घोषणा केलीय. शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. कारण विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दरमहा विद्यावेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होणारय. अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना 40 रुपये विद्यावेतन दिले जात होते. त्यात आता मोठी वाढ होणार असून 500 रुपयांचं विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली आहे.

आज विधानसभेत आमदार विक्रम काळे, डॉ. सुधीर तांबे, सतिश चव्हाण, बाळाराम पाटील यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा प्रश्न विचारला. राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून दरमहा 40 रुपये विद्यावेतन देण्यात येत होते. वाढत्या महागाईच्या काळात हे विद्यावेतन अत्यंत कमी असल्याचा मुद्या आमदारांनी उपस्थित केला. सरकारकडून या विद्यावेतनामध्ये वाढ केली जाणार का, असाही प्रश्न उपस्थित केला होता.

आमदारांच्या या प्रश्नांना राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर देताना विद्यावेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवण्याची कार्यवाही सुरु असल्याचं सांगितलं. राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांसाठीचं विद्यावेतन 40 रुपयांवरून 500 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. संबंधित प्रस्ताव हा मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली.

आयटीआयमधील कोर्सेस हे कालबाह्य झाले असून नवीन कोर्सेस बाबत सरकार पुढील वर्षी घोषणा करणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. राज्यातील 36 जिल्ह्यासाठी एक कमिटी स्थापन केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी आवश्यक असणारे कोर्स घेतले जातील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Tags

follow us