दादांचं अपूर्ण स्वप्न वहिनी पूर्ण करतील; 2029 ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासह बारामतीतून लढणार? जय पवारांचं मोठं विधान

राष्ट्रवादीचे युवा नेते आणि अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी पुन्हा एकदा 2029 च्या निवडणुकीवर भाष्य करत मोठं विधान केलं आहे.

Untitled Design 87

Jai Pawar’s big statement : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मताधिक्क्याने विजय मिळवत बारामतीतील आपली राजकीय पकड अधिक मजबूत केली. त्यामुळे, सध्याच्या घडीला अजित पवार यांच्या राजकीय वारसदार म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहिले जात आहे.

मात्र बारामतीतील मतदानादरम्यानच 2029 च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीतून नेमकं कोण मैदानात उतरणार? याबाबत राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. रोहित पवार, जय पवार आणि युगेंद्र पवार यांच्या वक्तव्यांमुळे या चर्चेला अधिकच रंग चढला. एका जागेसाठी पवार कुटुंबातील तीन चेहरे चर्चेत आल्याने बारामतीतील आगामी राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली होती.

दरम्यान, राष्ट्रवादीचे युवा नेते आणि अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी पुन्हा एकदा 2029 च्या निवडणुकीवर भाष्य करत मोठं विधान केलं आहे. सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी तुमचं नाव चर्चेत असल्याबाबत विचारणा करण्यात आली असता, चर्चा होत आहेत, पण मी इथेच राहून सर्वांसाठी काम करणार, असं सांगत त्यांनी खासदारकीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

भुजबळ, परांजपे की आणखी कोणी ? राज्यसभेवर जाण्यासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच…

यावेळी त्यांनी 2029 च्या बारामती विधानसभा निवडणुकीबाबत देखील स्पष्ट संकेत दिले. काही दिवसांपूर्वी सहकाऱ्यांसोबत चर्चा झाली. बारामतीकरांची आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एकचं इच्छा होती की दादांना एकदा मुख्यमंत्री झालेलं पाहायचं होतं. मात्र ते स्वप्न अपूर्ण राहीलं. आता वाहिनी म्हणजेच सुनेत्रा पवार खूप मेहनत घेत आहेत. त्यामुळे 2029 मध्ये बारामतीतून विधानसभेची निवडणूक त्या लढवतील आणि मुख्यमंत्री म्हणून त्या राज्याचं नेतृत्व करतील, अशी आमची आशा आहे, असं जय पवार यांनी म्हटलं.

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, ही केवळ बारामतीकरांचीच नव्हे तर राज्यभरातील राशयरवाडी कार्यकर्त्यांची देखील मोठी इच्छा होती. मात्र, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ते स्वप्न अपूर्ण राहिलं. आता सुनेत्रा पवार मुख्यमंत्री बनून अजित पवार यांची अपूर्ण इच्छा पूर्ण करतील, अशी भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. जय पवार यांच्या या वक्तव्यानंतर 2029 च्या राजकीय रणधुमाळीची चारच पुन्हा एकदा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या राज्यात भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, तर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत आहेत. दुसरीकडे, शिवसेना कार्यकर्त्यांकडून देखील एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी सातत्याने मागणी होत असते. त्यामुळे आगामी काळात महायुतीतील मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा अधीकच रंगतदार होण्याची शक्यता व्यलत केली जात आहे.

follow us