छत्रपती शिवाजी महाराजांशी नितेश राणेंची तुलना; जैन मुनी निलेशचंद्रांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड

महावीर जयंतीनिमित्त कार्यक्रमात राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे मुनी निलेशचंद्र यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी नितेश राणे यांची तुलना केली.

  • Written By: Published:
Untitled Design 33

Jain sage Nilesh Chandra’s statement sparks fresh controversy : राज्यात पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. यावेळी वादाच्या केंद्रस्थानी आहेत नितेश राणे आणि त्यांच्याबाबत करण्यात आलेलं एक धक्कादायक वक्तव्य. महावीर जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे मुनी निलेशचंद्र यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नितेश राणे यांची तुलना केली. नितेश राणे यांची उंची शिवरायांइतकीच असल्याचं म्हणत त्यांनी केवळ मंत्रीच नव्हे, तर मुख्यमंत्री होण्याची देखील क्षमता त्यांच्यात असल्याचं विधान केलं.

या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम नितेश राणे यांच्या उपस्थितीतच पार पडला, त्यामुळे या विधानाला अधिकच राजकीय रंग चढला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. याआधी नयन पद्मसागर यांनी करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी या जैन असल्याचा दावा करत मोठा वाद निर्माण केला होता. त्यावेळी संजय राऊत यांच्यासह अनेकांनी या वक्तव्याचा निषेध केला होता.

वाद चिघळत असताना, मुनी निलेशचंद्र यांनी पुढे येत नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेची आणि मराठा समाजाची माफी मागितली होती. तसेच ते वक्तव्य जैन समाजाचं नसून वैयक्तिक मत असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे हा वाद शांत झाला होता. मात्र, आता त्याच मुनी निलेशचंद्र यांच्या नव्या वक्तव्यमुळे पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या आदर्श व्यक्तिमत्वाशी तुलना केल्यामुळे विविध स्टारनून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, नितेश राणे यांनी यावर अद्याप थेट प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, या वक्तव्यामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात आधीच संवेदनशील वातावरण असताना अशा विधानांमुळे सामाजिक तणाव वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. एकीकडे गौरवाचे शब्द, तर दुसरीकडे भावना दुखावल्याचे प्रतिक्रिया, या सर्वांमध्ये हा वाद नेमका कुठे थांबणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us