अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट; 10 दिवस उलटूनही कल्पना खरात फरार, मैत्रिणी-नोकरांपासून माहेरपर्यंत चौकशी

शिर्डी पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ती नाशिकमधील राहत्या घरातून फरार झाली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 76

Kalpana Kharat absconding : नाशिक जिल्ह्यातील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला असून, त्याच्या अटकेनंतर आता पोलिसांचे लक्ष त्याची पत्नी कल्पना खरात हिच्या शोधावर केंद्रीत झाले आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ती नाशिकमधील राहत्या घरातून फरार झाली आहे. तब्बल दहा दिवस उलटूनही तिचा ठावठिकाणा लागत नसल्याने एसआयटीने तपासाची व्याप्ती आणखी वाढवली आहे.

तपास यंत्रणेने आता कल्पना खरातच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले आहे. नाशिकमधील तिच्या काही जवळच्या मैत्रिणींची चौकशी करण्यात आली असून, तिच्या घरात सध्या काम करणारे तसेच यापूर्वी काम सोडून गेलेले नोकर यांच्याकडूनही माहिती गोळा केली जात आहे. कल्पना नेमकी कोणाच्या संपर्कात होती, ती सध्या कुठे लपली असण्याची शक्यता आहे, याचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी सर्व शक्य दिशा तपासायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, तपासाच्या अनुषंगाने पोलिसांचे पथक सिन्नर तालुक्यातील पाडळी या तिच्या माहेरी पोहोचले असता धक्कादायक माहिती समोर आली. कल्पना खरात गेल्या तब्बल सोळा वर्षांपासून आपल्या माहेरच्या कुटुंबीयांच्या संपर्कात नव्हती, असा खुलासा तिच्या नातेवाईकांनी केला आहे. अशोक खरात तिला कधीही माहेरी येऊ देत नव्हता, असेही तिच्या भावांनी सांगितले. अत्यंत सामान्य परिस्थितीत शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या तिच्या माहेरच्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

आज ए दोस्ती हम नही तोडेंगे, उद्या जा बेवफा जा, रोहित पवारांचा भाजपच्या मित्रपक्षांना सूचक इशारा

शिर्डीतील एका शेतकऱ्याची जमीन खरेदी प्रकरणात मोठी फसवणूक केल्याचा आरोप कल्पना खरातवर आहे. या व्यवहारातील काही रक्कम तिच्या भावांच्या बँक खात्यांमधून फिरल्याचेही तपासात उघड झाले आहे. त्यामुळेच SITने अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन आणि कल्पनाच्या दोन भावांची सखोल चौकशी केली होती. तसेच, कल्पना खरात देशाबाहेर फरार होऊ नये यासाठी पोलिसांनी तिच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे आता विमानतळ आणि सीमावर्ती भागांवरही सतर्कता वाढवण्यात आली आहे.

कल्पना खरात हिचे मूळ नाव सुनीता शिंदे असून ती सिन्नर तालुक्यातील पाडळी गावची रहिवासी आहे. सातवीपर्यंतचे शिक्षण तिने गावात घेतले, तर पुढील शिक्षण ठाणगाव येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केले. 1993 साली अशोक खरातशी विवाहानंतर तिचे नाव कल्पना खरात झाले. दोन मुली आणि एक मुलगा असा तिचा परिवार असून, अशोक खरातच्या कथित बेकायदेशीर साम्राज्यात तिचीही सक्रिय भूमिका असल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या संपूर्ण तपास यंत्रणा तिच्या शोधासाठी सज्ज असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

follow us