होळीच्या सणाचा राज्यात उत्साह… जाणून घ्या महत्त्व
 
          मुंबई : होळीच्या सणानिमित्त (Holi festival) देशभरात उत्साहाचे वातवारण आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीचे महत्व आहे. या सणाला लोक आपपसातील मतभेद विसरुन एकत्र येतात. होळीच्या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन अशी विविध नावे आहेत.
होळीसोबतच (Holi 2023) विविध प्रकारचे रंग हे प्रेम आणि सौहार्दाचे प्रतीक आहेत. होळी सणातून लोकांमधील परस्पर प्रेम आणि आपुलकी वाढते. होलिका सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा नाश करते आणि सकारात्मकतेची सुरुवात होते, अशी लोकांची भावना आहे.
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून लाकडं मंत्रोच्चारात जाळतात येतात, पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे. होळी नंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.
पालघर, नाशिक, बुलढाण्यात अवकाळी पाऊस बरसला, शेतकरी चिंतेत
होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला ‘धुळवड’ असेही म्हणतात. या दिवशी होळीची राख अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते. या दिवशी एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.
या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, फाग, फागुन “दोलायात्रा”, “कामदहन” अशी वेगवेगळी नावे आहेत. कोकणात शिमगो म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला “फाल्गुनोत्सव”,आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त “वसंतागमनोत्सव” किंवा “वसंतोत्सव” असेही म्हणण्यात येते.


 
                            





 
		


 
                         
                        