धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून 12 वीच्या विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवलं, भोपाळ हादरलं

Madhya Pradesh Crime Student Tried To Burn Teacher : एका अठरा वर्षीय विद्यार्थ्यानं आपल्या शिक्षिकेवर एकतर्फी प्रेमातून (One Side Love) पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. या प्रकारानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh Crime) नरसिंहपूर जिल्ह्यात घडली. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील चौकशी (Crime News) सुरू केली आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना सोमवारी दुपारी साधारण साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी विद्यार्थी सूर्यांश कोचर (वय 18) हा इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेतो. तर पीडित शिक्षिका स्मृती दीक्षित (वय 26) या जिल्ह्यातील शाळेत अध्यापन (Student Tried To Burn) करतात. पोलिसांच्या माहितीनुसार, सूर्यांश हातात पेट्रोलनं भरलेली बाटली घेऊन स्मृती दीक्षित यांच्या घरी पोहोचला. अचानक त्यानं त्यांच्यावर पेट्रोल ओतलं आणि जाळण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यानंतर तो तात्काळ घटनास्थळावरून फरार झाला. गंभीर अवस्थेत स्मृती यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वैद्यकीय अहवालानुसार त्या 10 ते 15 टक्के भाजल्या असून, सुदैवाने त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
भाजपच्या नादाला लागून निवडणूक आयोगाने देशभर… बाळासाहेब थोरातांचा निशाणा
ओळख आणि एकतर्फी प्रेम
सूर्यांश आणि स्मृती दीक्षित यांची ओळख मागील दोन वर्षांपासून होती. मात्र सूर्यांशचं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं. काही दिवसांपूर्वी शाळेतील स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सूर्यांशने शिक्षिकेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याबाबत स्मृती यांनी शाळा प्रशासनाकडे औपचारिक तक्रार केली. या घटनेचा राग मनात धरून सूर्यांशनं सूड उगवण्याचा कट रचला. शाळेतून काढून टाकल्यानंतर तो दुसऱ्या शाळेत प्रवेश घेत होता. पण शिक्षिकेविषयीची वैरभावना त्याच्या मनात कायम होती. त्यामुळेच त्यानं थंड डोक्यानं हल्ल्याची योजना आखून ती प्रत्यक्षात आणली.
पोलिसांची कारवाई
नरसिंहपूर पोलीस अधिकारी मनोज गुप्ता यांनी सांगितलं की, हा हल्ला पूर्णपणे पूर्वनियोजित होता. आरोपीनं आधीच पेट्रोल भरून ठेवलेलं होतं. शिक्षिकेच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीचा बदला घेण्यासाठी त्यानं ही हिंसक कृती केली. या प्रकरणी सूर्यांशविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 124 सह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शोध मोहिम राबवून आरोपीला कल्याणपूर गावातून अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी सुरू आहे.
समाजात संताप
या घटनेनंतर शिक्षण क्षेत्रातील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका शिक्षिकेवर तिच्याच विद्यार्थ्यानं जीवघेणा हल्ला केल्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात संतापाचं वातावरण आहे.