Kopargaon Crime : दगडाने ठेचून 33 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; मंदिरासमोर रक्तरंजित थरार
Kopargaon Crime : कोपरगाव तालुक्यातील संवत्सरजवळील रामवाडी येथे रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका 33 वर्षीय युवकाची दगडाने
Kopargaon Crime : कोपरगाव तालुक्यातील संवत्सरजवळील रामवाडी येथे रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका 33 वर्षीय युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. हनुमान मंदिरासमोर घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत युवकाचे नाव नवनाथ माधव कानफाटे (वय 33) असे असून, अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर दगड आणि विटांनी सपासप वार करत जागीच ठार मारल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात दगड-विटांचा खच आढळून आला असून, परिसर अक्षरशः रक्ताने माखलेला होता. या भीषण प्रकारामुळे रामवाडी गाव हादरून गेले आहे. घटनेची माहिती मिळताच शिर्डी विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती आणि कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार (Ramakrishna Kumbhar) यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, पीएसआय दीपक रोठे यांच्यासह अधिकाऱ्यांनी पंचनामा करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयितांचा माग काढण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.
जुना वाद, वैयक्तिक वैर किंवा अन्य काही कारण ?
खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जुना वाद, वैयक्तिक वैर किंवा अन्य काही कारण या दिशेने पोलीस तपास करत आहेत. रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वेगाने सुरू आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
दुबईत अडकलेल्या नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था
गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. रामवाडीतल्या या थरारक हत्येमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपी कोण? खुनामागील खरा हेतू काय? या प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत.
