विधानपरिषदेला कुठूनच संधी नाही…लक्ष्मण हाके यांनी मग स्वतःच उचलला ‘गोवर्धन पर्वत’

ठाम आणि संघर्षमय कॅप्शनसह त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टमुळे ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षण या वादाला नव्याने हवा मिळाल्याचं दिसून येत आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 58

Laxman Hake’s commentary on the Hyderabad Gazette : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची एक सोशल मीडियावरील पोस्ट सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. मरेन पण घेतला वसा सोडणार नाही, अशा ठाम आणि संघर्षमय कॅप्शनसह त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टमुळे ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षण या वादाला नव्याने हवा मिळाल्याचं दिसून येत आहे. या पोस्टमध्ये हाके यांनी स्वतःच एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. या चित्रात ते मराठा आरक्षणाशी संबंधित हैद्राबाद गॅझेटच्या कागदावर उभे असल्याचं दाखवलं आहे. त्यांच्या एका हातात पेन असून दुसऱ्या हाताने त्यांनी एक मोठा डोंगर उचललेला आहे. हा डोंगर ओबीसी गोवर्धन पर्वत म्हणून दर्शवण्यात आला आहे. या प्रतीकात्मक चित्रातून ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट होतं.

या चित्रात खाली काही व्यक्ती लाठ्या-काठ्यांसह उभ्या असल्याचं दिसतं, तर काही जण हाके यांच्या दिशेने दगडफेक करताना दिसून येत आहेत. यातील एका व्यक्तीला म्होरक्या असा उल्लेख करण्यात आला आहे. या घटकांमध्ये हाके यांनी आपल्या विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याचे बोललं जात आहे. विशेषतः आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या संघर्षात काही नेते आणि गट ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणत असल्याचा आरोप या माध्यमातून सूचित केल्याचं राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

हैद्राबाद गॅझेट हा सध्या मराठा आरक्षणाच्या चर्चेतला एक महत्वाचा मुद्दा ठरत आहे. या गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी चर्चा आहे. मात्र, यालाच ओबीसी संघटनांकडून तीव्र विरोध होताना दिसत आहे. लक्ष्मण हाके यांची ही पोस्ट त्या विरोधाचंच एक प्रतीक म्हणून पहिली जात आहे.

सोशल मीडियावरील आर्थिक सल्ल्यांना नवे नियम; नोंदणीकृत संस्थांना नाव व नोंदणी क्रमांक दाखवणे बंधनकारक

राजकीयदृष्ट्या पाहिल्यास, हाके यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील आरक्षणाचा प्रश्न आणखी तापण्याची शक्यता आहे. एकीकडे मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत असताना, दुसरीकडे ओबीसी नेते आपल्या हक्कांवर कुठलाही परिणाम होऊ न देण्याच्या भूमिकेत ठाम दिसत आहेत. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा केवळ सामाजिकच नाही तर राजकारणात देखील महत्वाचा ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान हाके यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काहींनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, तर काहींनी या पोस्टवर टीका करत ती समाजात तणाव निर्माण करणारी असल्याचं म्हटलं आहे. एकंदरीत, लक्ष्मण हाके यांची ही पोस्ट केवळ एक सोशल मीडिया अभिव्यती न राहता, राज्यातील सुरू असलेल्या आरक्षणाच्या राजकारणाला अधिक तीव्र करणारी ठरत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे.

follow us