आभाळ दाटणार, पावसाची प्रतीक्षा संपणार; जूनच्या अखेरीस राज्यभर मान्सूनच्या सरी कोसळण्याची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागांना चांगल्या पावसाची भेट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 26

Likelihood of monsoon showers : जून महिना अर्धा उलटून गेला, तरी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. उलट उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र आता राज्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. खंडित झालेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होत असून, येत्या काही दिवसांत तो महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये वेगाने पुढे सरकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागांना चांगल्या पावसाची भेट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदा मान्सूनने केरळमध्ये वेळेआधी प्रवेश केला होता. त्यामुळे देशभरात मान्सूनच्या जलद प्रगतीची अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र त्यानंतर वातावरणातील बदलांमुळे मान्सूनची वाटचाल मंदावली आणि अनेक राज्यांमध्ये त्याचा वेग थांबला. महाराष्ट्रातही दक्षिण कोकणापर्यंत दाखल झालेला मान्सून पुढे सरकू शकला नाही. त्यामुळे जूनच्या पहिल्या पंधरवड्यानंतरही मुंबईसह राज्यातील अनेक भाग पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, मान्सूनच्या खंडित प्रवासामुळे राज्यातील तापमानात वाढ झाली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक शहरांमध्ये उष्णता आणि दमट वातावरणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोकण किनारपट्टीवरील भागांमध्ये उकाड्याचा त्रास अधिक जाणवत आहे. मात्र आता हवामान विभागाने आशादायक अंदाज वर्तवला आहे. विभागाच्या माहितीनुसार, 22 ते 23 जूनपासून दक्षिण कोकण आणि महाराष्ट्रालगतच्या भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर वातावरणातील अनुकूल बदलांमुळे मान्सूनचा वेग वाढण्याची शक्यता असून, 24 ते 26 जूनदरम्यान मुंबईसह उत्तर कोकण आणि राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर पण भाजपकडून एक अट; ठाकरेंच्या निकटवर्तीय वकिलांचे खळबळजनक ट्वीट

सध्या मान्सूनची उत्तर सीमा हर्णे, सोलापूर, हैदराबाद, भद्राचलम, कोरापुट, फुलबनी, रांची, जमुई आणि मुजफ्फरपूर या भागांतून जात आहे. हवामान विभागाच्या मते, 23 जूनच्या सुमारास वातावरण मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अधिक अनुकूल होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासोबतच तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्येही मान्सून वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे. मान्सूनची प्रतीक्षा वाढत असताना उष्णतेचा कहर मात्र कायम आहे. 20जून रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली.

तर विदर्भ आणि पूर्व उत्तर प्रदेशात 25 जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठीही मान्सूनची वाटचाल महत्त्वाची ठरणार आहे. अनेक ठिकाणी खरीप हंगामाच्या पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. वेळेत आणि समाधानकारक पाऊस झाल्यास पेरण्यांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे.

25 जून ते 1 जुलै या कालावधीत मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सून दाखल झाल्यानंतर त्याचा प्रभाव राज्याच्या इतर भागांमध्येही दिसून येईल. खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि पश्चिम मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

RTI कायद्यातील बदलांवर अण्णा हजारे आक्रमक; शुल्कवाढ आणि नव्या नियमांविरोधात फडणवीस सरकारला उपोषणाचा इशारा

पूर्व मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना मात्र आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. या भागांमध्ये जुलैच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पूर्वमोसमी सरी कोसळू शकतात. याशिवाय 23 आणि 24 जून रोजी कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिक आणि मच्छीमारांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलं की, 2019 आणि 2023 या एल-निनोच्या वर्षांमध्ये मुंबईत मान्सूनचे आगमन सुमारे 14 दिवस उशिरा झाले होते. यंदाही एल-निनोचा प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईत मान्सून उशिरा दाखल होत असून, 25 जूनच्या आसपास मान्सून मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे.

एकीकडे उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असताना, दुसरीकडे आता मान्सूनच्या पुनरागमनाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जूनच्या अखेरीस महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे.

follow us