पीकविम्याचे पैसे कधी मिळणार? ; कृषीमंत्री सत्तारांनी सांगितली तारीख
Abdul Sattar : मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरलेली असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज पीकविम्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
मंत्री सत्तार विधानपरिषदेत म्हणाले, की अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे 31 मे पर्यंत दिले जातील. नुकसान झालेला एकही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
वाचा : Unseasonal Rain विजा, गारांसह राज्यात वादळी पाऊस!
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना 2305 कोटी रुपये नुकसान भरपाई रक्कम कंपन्यांनी दिली आहे. ही योजना केंद्र सरकारची आहे त्यामुळे यामध्ये राज्य सरकारला फारसे अधिकार नाही.
दरम्यान, राज्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. मात्र, या संकटाच्या घडीत त्यांना सरकारी मदत मिळणेही गरजेचे आहे. सरकारनेही शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे म्हटले आहे. पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळेल.
गद्दार सत्तार हाय हाय, विधानभवनाच्या पायर्यांवर विरोधकांची घोषणाबाजी
पावसामुळे नुकसान झालेली पिके शेतात तशीच पडून आहेत. जोपर्यंत पीक नुकसानीचे पंचनामे होत नाहीत तोपर्यंत नुकसान झालेला शेतमाल तसाच पडून राहणार आहे. हा शेतमाल आधीच काढून घेतला तर नुकसान भरपाई मिळणार नाही अशीही भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. त्यामुळे राज्य सरकारने पंचनाम्यांची वाट न पाहता तत्काळ सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे.