रेल्वे तिकीटांच्या आरक्षणात घोटाळ्याचा वास? अजितदादांना मिळाली चक्क राणेंची साथ

रेल्वे तिकीटांच्या आरक्षणात घोटाळ्याचा वास? अजितदादांना मिळाली चक्क राणेंची साथ

Ajit Pawar :  गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण अवघ्या एक मिनिटात फुल होत आहे. वेटिंग लिस्टचे लांबच्या लांब फलक लागले आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर असून रेल्वे आरक्षणात गैरप्रकार होत असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. पवार यांनी यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना पत्र पाठवले आहे.

विशेष म्हणजे, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कडाडून प्रहार करणारे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचीही अजितदादांना साथ मिळाली आहे. त्यांनीही या प्रकाराची चौकशीची मागणी केली आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना आतापासूनच प्रतिक्षा यादींचे फलक लागले आहेत. 15 सप्टेंबरला सुटणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसची प्रतिक्षा यादी अवघ्या दीड मिनिटात हजारापार गेल्याची माहिती समोर आली आहे. तर 16 सप्टेंबरचे आरक्षण करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना सर्वच गाड्यांसमोर रिग्रेट हा मेसेज येत आहे. त्यामुळे रेल्वेग गाड्यांच्या आरक्षणात गैरप्रकार होत असावेत, अशी शंका घेण्यास वाव आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.

नाना पटोले, धनंजय मुंडे, रामराजे नाईक निंबाळकर, रवींद्र धंगेकर लागले खासदारकीच्या तयारीला!

यंदा गणेशोत्सव 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे आधी किमान दोन महिने म्हणजे 17 सप्टेंबर या प्रवासाच्या तारखेचे 120 दिवस आधीचे आरक्षण शुक्रवारी खुले झाले. मात्र पहिल्याच दिवशी अवघ्या एक ते दोन मिनिटात आरक्षण पूर्ण झाले. प्रतिक्षा यादीचे फलक लागले. हा प्रकार म्हणजे रेल्वेच्या आरक्षणात गैरप्रकार होत असण्याची शक्यता आहे.

रेल्वे तिकीटांची अवैध विक्री दलाल मोठ्या संख्येने तिकीटांचे आरक्षण करून ते चढ्या दराने विक्री करत असल्याचा अनुभव आहे. दलालांकडून मोठ्या संख्येने आरक्षण करून चढ्या दराने विक्री करण्याचे रॅकेट सुरू आहे. यामध्ये कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत, या गैर प्रकारात कोण सामील आहे, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या तिकीटांच्या आरक्षणाची मध्य आणि कोकण रेल्वेने चौकशी करावी. अशा रेल्वे दलालांवर नियंत्रण ठेवावे. तसेच कोकणच्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे कोकणात सोडाव्यात, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

 

 

माजी रेल्वेमंत्र्यांनीही पाठवले पत्र

या प्रकरणात आता माजी केंद्रीय रेल्वमंत्री सुरेश प्रभू यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी केंद्रीय रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहीले आहे. रेल्वेच्या तिकीटांसंदर्भात एका रेल्वे प्रवाशाने प्रभू यांना पत्र पाठवले होते. त्यांच्या या पत्राची दखल घेत प्रभू यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांना पत्र पाठवून या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube