Eknath Shinde झोपतात तरी कधी? त्यांचा ठाणे-पुणे-कोल्हापूर ते थेट आग्रा पुन्हा कोल्हापूर-पुणे प्रवास..
पुणे : मागील दोन दिवसांत राज्यात महाशिवरात्र, शिवजयंती, गृहमंत्री अमित शहांचा दौरा, शिवसृष्टीचे लोकार्पण, ‘मोदी अॅट 20’ पुस्तक प्रकाशन अशा अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) रात्रीनंतर कमालीचे अॅक्टिव्ह दिसले. कार्यक्रम सकाळी असो दुपारी की संध्याकाळी या प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री हजर होतेच. कधी पुण्यात तर कधी कोल्हापूर तर कधी थेट उत्तर प्रदेशातील आग्रा,असे सारखे फिरत होते. मग इतक्या सगळ्या कार्यक्रमांना ते हजर राहतात तरी कसे ?, त्यांना राज्याचा कारभारही पहायचा आहे ना ? ते झोपतात तरी कधी ?, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील. मात्र, राज्यकर्त्यांची हीच तरी खासियत असते. राज्यकारभारही करतात आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमातही मिसळतात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन दिवसांतील कार्यक्रमांचे वेळापत्रक पाहिले तर हे अगदी स्पष्टपणे दिसून येते. निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. त्यानंतरच्या घडामोडीत शिंदे अॅक्टिव्ह होते. कार्यकर्त्यांच्या बैठका, रात्री उशीरापर्यंत कार्यकर्त्यांचा सुरू असलेला जल्लोष, माध्यमांशी संवाद या प्रत्येक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती ठळकपणे दिसत होती. यानंतर त्यांनी सकाळीच महाशिवरात्रीनिमित्त ठाण्यातील शिव मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर लगेच राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर पुण्यातील एका माध्यम समूहाच्या कार्यक्रमातही मुख्यमंत्री हजर होते. याच दिवशी पुण्यात मोदी अॅट 20 पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमालाही ते उपस्थित होते. हे दोन्ही रात्रीचे कार्यक्रम संपवून ते रात्री पुन्हा ठाण्यात गेले, तेथे रात्री बारा वाजता टेंभी नाक्यावर शिवजयंती परंपरेप्रमाणे साजरी केली. ही प्रथा त्यांनी मुख्यमंत्री असतानाही कायम ठेवली आहे. टेंभी नाक्यावरचा कार्यक्रम संपवून त्यांनी पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिवजयंती कार्यक्रमाला हजेरी लावली.
हे वाचा : Vishwambhar Choudhary : शिवसेना संपवणे हा मूळ हेतू आहे, शिंदेंवर घणाघाती टीका
येथील कार्यक्रम आटौपून ते परत पुण्यात आले. येथे दुपारी शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यास हजर होते. हा कार्यक्रमही बराच वेळ चालला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनाही कोल्हापूरला जायचे होते . या तिघांनीही कोल्हापुरातील दोन कार्यक्रमांना एकत्रित उपस्थिती लावली. कोल्हापुरातील अंबाबाईचे दर्शन घेतले. येथे सायंकाळी भाजपची (BJP) विजय संकल्प सभा होती. या सभेला उपस्थित न राहता शिंदे हे थेट उत्तर प्रदेशात आग्रा येथे रात्री 9 वाजता पोहोचले.
हा कार्यक्रम होतो न होतो तोच त्यांनी तत्काळ उत्तर प्रदेशातील आग्रा गाठले. येथे तर ते थेट रात्री 9 वाजता पोहोचले. येथे लोक त्यांची वाट पाहत होतेच. कारण, येथील किल्ल्यात पहिल्यांदाच शिवजयंती साजरी होत होती. त्यामुळे उत्सुकता तर होतीच. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम आटोपून ते रात्रीच निघाले आणि पुन्हा कोल्हापूरला आले. सोमवारी सकाळी येथे कार्यक्रमांना हजेरी लावली. येथील कार्यक्रम आटोपून ते आता पुण्यात आले आहेत. येथे सोमवारी सायंकाळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे त्यांची सांत्वनपर भेट मुख्यमंत्री घेतली. यानंतर सायंकाळी लगेचच कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी नियोजन व बैठका सुरू केल्या.
या सर्व धावपळीत मुख्यमंत्री हे व्यासपीठावर डुकल्या काढत आहेत किंवा पेंग काढत आहेत असे दिसले नाही. आपल्याला तीन ते चार तासांची झोप पुरेशी असते असे ते अनेकदा सांगतात. या गेल्या तीन चार दिवसात त्यांची झोपही अनेकदा प्रवासात गाडीत किंवा विमानात झाल्याचे दिसते. मुख्यमंत्र्यांच्या या धावपळीचे राजकीय वर्तुळात अनेकदा कौतुक होत असते. वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत शिंदे यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी असते. त्यानंतर शिंदे सकाळी किती वाजता कार्यक्रम असला तरी ते हजर असतात याचा प्रत्यय गेल्या तीन दिवसात आला.