बीआरएसला विदर्भात बळ ! भाजपच्या ‘या’ माजी आमदाराने केला पक्षात प्रवेश
BRS News : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस (BRS) पक्षाची अनेकांना भुरळ पडत आहे. कन्नडचे माजी आमदार तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर आता विदर्भातील माजी आमदारानेही भारत राष्ट्र समितीचा झेंडा हाती घेतला आहे.
तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. हैदरापबाद येथील राव यांच्या निवासस्थानी काल वाघमारे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश केला.
राधाकृष्ण विखे पाटलांशी दोस्ती पण… अब्दुल सत्तारांनी घेतला यूटर्न
चंद्रशेखर राव यांची नांदेडला सभा झाली त्यावेळी त्यांनी तेलंगाणात शेतकऱ्यांचा कसा विकास झाला. त्यांच्या योजना कशा पद्धतीने राबविल्या गेल्या हे सांगितले. त्यांना भेटल्यानंतर आम्ही प्रभावित झालो आणि पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
कोण आहेत चरण वाघमारे ?
चरण वाघमारे हे भाजपचे आमदार म्हणून ओळखले जायचे. 2019 च्या निवडणुकीत त्यांना भाजपने तिकीट नाकारले. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. 2023 मध्ये तेलंगाणाचे मुख्यमंत्री राव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे.
सत्तार भावनिक माणूस, सत्तारांच्या वक्तव्यावर विखेंचं स्पष्टीकरण
मराठवाडा टार्गेट
भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात प्रवेश केला असून सर्वात आधी मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. येथील अनेकांना पक्षात सामावून घेतले आहे. या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्या नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. जे तेलंगाणा सरकार शेतकऱ्यांसाठी करू शकते ते महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही, असा प्रश्न राव नेहमीच विचारतात.