महाराष्ट्र सरकारचा नव्या विमान कंपन्यांसोबत करार; राज्यात विमानसेवेचा विस्तार होणार
Airplane : महाराष्ट्रातील विमानसेवा विस्तारण्यासाठी राज्य सरकारनं नव्या विमान कंपन्यांसोबत करार करण्याची तयारी सुरू केली.
राज्यातील अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासासाठी (Airplane) भाडेतत्त्वावर हेलिकॉप्टर आणि विमान उपलब्ध करुन देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन कंपन्यांच्या कराराला महाराष्ट्र सरकारने 3 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ‘साई एव्हिएशन’ आणि ‘ज्योती एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर्स प्रा. लि.’ या कंपन्यांमार्फत ही सेवा उपलब्ध करुन दिली जात आहे. या दोन्ही कंपन्यांना नव्या निविदा प्रक्रियेतून सेवा देण्यासाठी नियुक्त करण्याची कार्यवाही सुरु आहे.
या दोन्ही कंपन्यांसोबत 08/10/2024 ते 07/10/2026 या 2 वर्षांच्या कालावधीसाठी करार करण्यात आला होता. मात्र, नव्या निविदेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने हवाई सेवा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी विद्यमान कराराला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार आता 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवार आक्रमक; घटनेतील मुख्य सूत्रधाराबाबत मोठा गौप्यस्फोट
नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या दोन्ही कंपन्यांकडून पूर्वीच्या करारातील अटी व शर्तीनुसारच सेवा घेतली जाणार आहे. या कालावधीत हेलिकॉप्टर आणि विमान उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित कंपन्यांवर राहणार असून, नव्या निविदेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासाची सुविधा खंडित होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या सेवेसाठी होणारा खर्च शासनाच्या सर्वसाधारण प्रशासन विभागाच्या संबंधित अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 29/09/2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, उपसचिव वर्षा संदीप तांदेल यांच्या स्वाक्षरीने हा आदेश काढण्यात आला आहे.