‘फडणवीसांचं ऐकलं अन् पुरस्कार दिला’; अमित शाहांनी सांगितला ‘तो’ खास किस्सा
Amit Shah : ‘महाराष्ट्रात 1995 मध्ये ज्यावेळी भाजप शिवसेना युतीचे सरकार होते तेव्हापासून महाराष्ट्र भूषण पुरस्काराला सुरुवात झाली. त्यानंतर सरकारने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अनेकांना या पुरस्काराने सन्मानित केले. पुरस्कारांच्या या यादीत नानासाहेब धर्माधिकारी यांच्यानंतर अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांचे नाव जोडले गेले म्हणजे पहिल्यांदाच एकाच घरात दोन महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिले गेले. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य खूप मोठे आहे. सामाजिक चेतनेला पुढे नेण्याचे काम त्यांनी केले. महाराष्ट्र सरकारने पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीचीच निवड केली आहे’, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी काढले.
त्यानंतर अमित शहा यांनी पद्म पुरस्कारांबाबत एक खास आठवण सांगितली. ते म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. मी सुद्धा त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो. तेव्हा स्वतः उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अप्पासाहेब यांना पद्म पुरस्कार देण्याची शिफारस केली होती. आणि सरकारने अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याची महती लक्षात घेत त्यांना पद्म पुरस्कार दिला’, असे ते म्हणाले.
‘हॅलो नाही वंदे मातरम् आपल्याकडूनच शिकलो’; मुनगंटीवार अमित शहांसमोरच म्हणाले..
ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
शहा पुढे म्हणाले, ‘मी दिल्लीतून फक्त धर्माधिकारी यांच्या सन्मानासाठी येथे आलो आहे. प्रचंड उन्हाची पर्वा न करता लाखो लोक येथे जमलेले आहेत. यावरून दिसते की तुमच्या मनात अप्पासाहेबांबद्दल किती प्रेम आहे. आपण गर्दीमागे न जाता गर्दीच आपल्यामागे येईल असे काम धर्माधिकारी यांनी केले आहे. राज्य सरकारने आपल्याला फक्त पुरस्कारच दिला नाही तर लाखो लोकांना आपल्यासारखे जीवन जगण्यासाठी प्रेरित केले आहे. त्यामुळे टाळ्या वाजवून सरकारच्या पुरस्काराचे समर्थन करा’, असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. त्यानंतर लोकांनीही प्रतिसाद देत टाळ्यांचा कडकडाट केला.
आप्पासाहेब धर्माधिकारी जगातलं आठवं आश्चर्य, देवेंद्र फडणवीसांकडून गौरवोद्गार
शहा म्हणाले, ‘या महाराष्ट्राच्या भूमीने तीन धारा देशात प्रवाहित केल्या. पहिली राष्ट्रासाठी वीरतेची होती. दुसरी धारा भक्तीची. या विचारधारेने देशाचे नेतृत्व करण्याचे काम केले. तिसरी विचारधारा खूप कमी राज्यात दिसते पण येथूनच सुरू झाली ती म्हणजे सामाजिक चेतनेची धारा. सामाजिक आंदोलनाचे अनेक जनक याच भूमीने देशाला दिले. त्यानंतर आता नानासाहेब आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या सामाजिक चेतनेला पुढे नेण्याचे मोठे कार्य केले.’