वडेट्टीवारांचं ‘ते’ वक्तव्य महाविकास आघाडीला शेकणार? तर्कवितर्कांना उधाण

वडेट्टीवारांचं ‘ते’ वक्तव्य महाविकास आघाडीला शेकणार? तर्कवितर्कांना उधाण

Lok Sabha Election 2024 : हेमंत करकरे यांना लागलेली गोळी दहशतवादी अजमल कसाबची नाही तर आरएसएस समर्पित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती, असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरात संतापाची लाट उसळली. नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आले. भाजप नेते तर त्यांच्यावर तुटून पडले. वक्तव्य महागात पडणार याचा अंदाज येताच वडेट्टीवारांनी सारवासारव केली. आघाडीच्या नेत्यांनीही सारवासारव केली. पण, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत असं वक्तव्य केलं गेलं आता या वक्तव्याचा फटका महाविकास आघाडीला बसणार असा अंदाज व्यक्त होत आहे.

वडेट्टीवार यांच्या विधानामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली. कसाबला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी उज्ज्वल निकम यांनी प्रयत्न केले. आता याच निकम यांना महायुतीने उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. यानंतरच काँग्रेस नेत्यांकडून त्यांच्यावर असे आरोप होऊ लागल्याचे सांगितले जात आहे. यानंतर जनतेमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीविषयी नाराजी निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.

“हेमंत करकरेंना लागलेली गोळी कसाबची नाही, RSS समर्पित अधिकाऱ्याची” वडेट्टीवारांच्या वक्तव्याने वाद पेटला

आपल्याविषयी नाराजी वाढताना दिसल्यावर वडेट्टीवारांकडून सारवासारव सुरु झाली. मी अमुक तमुक पुस्तकाचा दाखला घेऊन बोललो वगैरै ते आता सांगू लागले आहेत. मात्र कोणतीही खातरजमा न करता अशी बेछूट विधाने केलीच का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. केवळ काँग्रेसच नव्हे तर यामुळे महाविकास आघाडीबद्दल नाराजीचे वातावरण आहे. उद्धव ठाकरेंनी किंवा शरद पवार यांनी अद्याप याविरुद्ध काही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे वडेट्टीवार यांच्या या वक्तव्याने निवडणुकीत महविकास आघाडीला खरंच फटका बसणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुश्रीफांच्या पुस्तकाच्या दाखल्यानेच बोललो : वडेट्टीवार

दरम्यान, या वक्तव्यानंतर वडेट्टीवार यांनी तत्काळ स्पष्टीकरणही दिलं होतं. एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन केल्याचे वडेट्टीवार म्हणाले. यामध्ये मी काहीही म्हटलं नाही. विलासराव देशमुखांनी त्यावेळी सांगितलं होतं की कसाबला फाशी झाली याचं श्रेय घेण्याची गरज नाही. कारण तो दहशतवादी होता त्याला फाशी होणारच होती. त्यामुळे यात बडेजावणा दाखवण्याची गरज नाही. मी हे एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन बोललो आहे. यावर त्यांना (उज्ज्वल निकम) काही खुलासा करायचा असेल तर त्यांनी करावा असेही वडेट्टीवार म्हणाले होते.

तिसऱ्या टप्प्यात महत्त्वाच्या जागांवर फटका ?

मविआच्या रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, म्हाडा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना याचा फटका बसू शकतो, अशी राजकीय चर्चा सुरू आहे.

‘आरएसएस अन् हेमंत करकरे यांच्यात संघर्ष’, संघाचे लोक.. राऊतांनी नेमकं काय सांगितलं ?

काँग्रेसवाल्यांच्या तोंडी पाकिस्तानची भाषा, त्यांना औकात दाखवू : फडणवीस

उज्ज्वल निकम यांच्यासारख्या देशभक्ताला सीट दिली तर हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले विरोधी पक्षनेते म्हणतात उज्ज्वल निकम यांनी अजमल कसाबची बदनामी केली. आता यांना अजमल कसाबच्या बदनामीची चिंता आहे. या कसाबने मुंबईत येऊन बॉम्बस्फोट केले त्या कसाबची यांना चिंता आहे. महायुती उज्ज्वल निकम यांच्या पाठिशी आहे. तर महाविकास आघाडी कसाबच्या मागे आहे. आता तुम्हाला निर्णय करायचा आहे. काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही. पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांना त्यांची औकात दाखवून दिली पाहिजे.

दहशतवादी कसाबची बाजू घेता, थोडी तरी लाज बाळगा : बावनकुळे

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पु्न्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावईशोध त्यांनी लावला. निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपला विरोध करण्यासाठी तु्म्ही 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा. काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्या पाकधार्जिण्या भूमिकेबद्दल जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube