“भाजपात जाऊन मी घोडचूक केली”; राष्ट्रवादीत प्रवेश होताच सूर्यकांता पाटलांनी स्पष्टच सांगितलं
Sharad Pawar Press Conference : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. ‘भाजपात जाऊन मी घोडचूक केली. मी भाजपात गेले तरी तिथं काहीच काम केलं नाही. मी रागामुळे राष्ट्रवादीतून बाहेर पडले होते. मात्र भाजपात जाऊनही दहा वर्षात मी तिथं काहीच केलं नाही. फक्त घरात बसून होते. कधीही कुणाला मत देण्याचं आवाहनही मी केलं नाही. पक्ष सोडतेवेळी साहेब (शरद पवार) मला म्हणाले होते की त्यांची विचारसरणी वेगळी आहे तिथं जाऊन तू काय करणार?’ अशी आठवण सूर्यकांता पाटील यांनी यावेळी सांगितली.
सूर्यकांता पाटील पुढे म्हणाल्या, साहेब आता तुम्ही फक्त आदेश द्या. तु्म्ही म्हणाल ते काम करायला मी तयार आहे. याआधी मीच रागात पक्षाला सोडंल होतं. दहा वर्ष भाकऱ्या भाजल्या. नातवंडांना मोठं केलं. शेती केली. पण आता मला काम करण्याची संधी द्या. 1999 मधील सूर्यकांता समजून माझ्यावर जबाबदारी टाका. मी भाजपात जाऊन घोडचूक केली. पक्ष सोडताना साहेब मला म्हणाले होते की तिथं जाऊन काय करणार. पण त्यावेळी मी काही त्यांचं ऐकलं नाही. माझी दहा वर्षे वाया गेली तिथं मला काहीच करता आलं नाही, अशी खंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा राजीनामा
भाजपने डावलल्याने सूर्यकांता पाटलांनी पक्ष सोडला
दरम्यान, सूर्यकांता पाटील यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी हदगाव मतदारसंघातून भाजपकडे विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र त्यांना संधी मिळाली नाही. पुढं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि डॉ. अजित गोपछडे यांना राज्यसभेत घेतल्याने त्या नाराज होत्या. दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन, अशोक चव्हाण यांचा भाजप पक्षप्रवेशावरून त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती.
हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी सूर्यकांत पाटील यांनी भाजपकडे तिकीट मागितले होते. मात्र ती जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे असल्याने त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळं त्यांनी सोशल मीडियावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. आयुष्यातील शेवटची निवडणूक लढवायची राहिली, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली होती. वेळोवेळी डावलण्यात आल्याने त्या नाराज होत्याच, अखेर त्यांनी आपला राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला होता.
अशोक चव्हाणांना सोबत घेऊनही भाजपची दमछाक? नांदेडमध्ये काँग्रेसचं पारडं जड