‘वर्षा बंगल्यावरून हातोडे मारण्याचे आदेश, मुख्यमंत्र्यांचे दिवटे चिरंजीव..’ शाखा कारवाईवर राऊत भडकले!
मुंबईतील वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेने कारवाई केली. यानंतर ठाकरे गटाचे नेते चांगलेच भडकले आहेत. या कारवाईच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हातोडा मारण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. यानंतर कार्यकर्त्यांनी आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्या नेतृत्वात पालिकेच्य एच-पूर्व विभागाच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. या घडामोडींवर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘अशीच नौटंकी करत राहिलात तर तेलंगणा सुद्धा’… राऊतांचा पंढरपुरात आलेल्या ‘KCR’ना इशारा
राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अनिल परब हे त्या भागातले विभाग प्रमुख आहेत. त्यांनी काल शेकडो शिवसैनिकांसह तिथे मोर्चा काढला. मोर्चात शिवसैनिकांना आणि जनतेच्या भावना अत्यंत संतप्त आणि तीव्र होत्या. एक जुनी शाखा चाळीस-पन्नास वर्षे जुनी असून हातोडा मारून तोडण्यात आली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हातोडे मारले जात होते. हे सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालले आहे म्हणता.
माझी पक्की माहिती आहे, हे हातोडे मारण्याचे आदेश वर्षा बंगल्यावरून आले. मुख्यमंत्र्यांचे दिवटे चिरंजीव त्यांच्याकडे कोणीतरी गेलं, त्यांनी हे आदेश दिलेले आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.
पण त्यांना हे कळलं नाही, ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आपण रोजी रोटी खात आहे, कोट्यावधी कमावत आहे, त्या बाळासाहेब यांच्या फोटो वरती हातोडे मारले जात आहेत, हे कसले शिवसैनिक? असा सवाल त्यांनी केला. त्यांनी शिवसेनेचे नाव घेऊ नये ते नकली आणि डुप्लिकेटच राहणार आहेत. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर तुम्ही आतापर्यंत जगलात, वाढलात आणि त्याच नावावर तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री पद मिळवले. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर तुम्ही हातोडे मारण्याचे आदेश देता. गुन्हे दाखल झाले, खटले दाखल झाले हे सांगू नका. बाळासाहेबांसाठी आम्ही असे अनेक खटले दाखल करून घेऊ, अनिल परब सक्षम आहेत. आम्हीही सक्षम आहोत, असा हल्लाबोल राऊत यांनी शिंदे गटावर केला.