आता काँग्रेस नाही राष्ट्रवादीच मोठा भाऊ; जागावाटपाच्या मुद्द्यावर अजितदादांचा पटोलेंना चिमटा
Ajit Pawar replies Nana Patole : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आघाडीचे नेते वक्तव्ये करत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटा काढला. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (NCP) कोल्हापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात पवार यांनी नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
पवारांनंतर पटोलेंचा वार! म्हणाले, कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारला..
पवार म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी मजबूत ठेवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. ताकद जास्त असेल तर आघाडीत महत्व टिकेल. याआधी काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या. त्यामुळे वाटाघाटी करताना राष्ट्रवादी काँग्रेसला लहान भावाची भूमिका घ्यावी लागायची. आता परिस्थिती वेगळी आहे. राज्यात सध्या काँग्रेसच्या 44 जागा आहेत तर राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत. त्यामुळे आता आम्ही मोठे भाऊ आहोत, असे पवार म्हणाले.
पटोले काय म्हणाले ?
याआधी शुक्रवारी नाना पटोले यांनी जागावाटपाबाबत वक्तव्य केले होते. जागा वाटप गुणवत्तेच्या आधारावर होईल. यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. सर्व जागा गुणवत्तेच्या आधारावर ठरविल्या जातील. तशीच चर्चा होईल, असे पटोले म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत ज्या जागा जिंकल्या आहेत त्या आमच्याच राहणार असल्याचे म्हटले होते. म्हणजे, त्या जागांवर थेट दावा सांगितला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते की जागावाटपाबाबत अजून काहीच ठरलेलं नाही. यासाठी तिन्ही पक्ष व आघाडीतील अन्य घटक पक्षांचे प्रमुख बसून चर्चा करू. प्रत्येकाला आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. तसा तो संजय राऊत यांनाही आहे.