Eknath Shinde : शिंदेंची क्रेझ सातासमुद्रपार; न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवरच झळकले फोटो
Eknath Shinde : शिवसेनेत बंड करून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात महत्वाची भूमिका पार पाडणारे नंतर राज्याचे मुख्यमंत्री झाले. या घडामोडींनंतर एकनाथ शिंदे राज्यभरात चर्चिले जाऊ लागले. आता त्यांची फक्त ठाणे मु्ंबईपुरतीच मर्यादीत राहिलेली नाही. तर सातासमुद्रापारही पोहोचली आहे. चक्क न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम स्क्वेअरवर शिंदेंचा फोटो झळकला आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून समजले जाणारे पण नंतर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या राहुल कनाल यांनीच हा उपक्रम राबविला आहे.
‘आदित्य ठाकरेंच्या डोळ्यांना पट्टी, उत्तर देऊन फायदा काय?’ फडणवीसांचा खोचक टोला
राहुल कनाल हे आधी आदित्य ठाकरे यांचे विश्वासू मानले जात होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. कनाल हे उद्योजक आहेत. काही दिवसांपूर्वी कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला होता. त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल या तिघांचे एकत्रित फोटो न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरमध्ये झळकले आहेत. त्यांच्या या फोटोची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
टाइम्स स्क्वेअरवर फोटो झळकलेले एकनाथ शिंदे हे राज्यातील पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. या फोटोची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर विरोधकांच्या प्रतिक्रिया अद्याप आलेल्या नाहीत. प्रतिक्रिया येतील हे मात्र नक्की. नेत्यांच्या वाढदिवशी त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागतात त्यावेळी जोरदार चर्चा होते प्रतिक्रियाही येतात. आता तर थेट अमेरिकेतच मुख्यमंत्री शिंदेंचे फोटो झळकले आहेत म्हटल्यानंतर प्रतिक्रिया येतील. विरोधी पक्षांचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.