मुख्यमंत्रीपद दूर जातंय का? कोंडीत टाकणाऱ्या सवालावर विखे पाटलांचं ‘सेफ’ उत्तर

मुख्यमंत्रीपद दूर जातंय का? कोंडीत टाकणाऱ्या सवालावर विखे पाटलांचं ‘सेफ’ उत्तर

Maharashtra Politics : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा मध्यंतरी जोरात सुरू होत्या. या चर्चांनी खुद्द मंत्री विखे सुद्धा हैराण झाले होते. त्यानंतर त्यांनी स्वतः माध्यमांसमोर येत याबाबत खुलासा करत हा प्रकार म्हणजे खोडसाळपणा असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता प्रसारमाध्यमांनी त्यांना पुन्हा हाच प्रश्न विचारला. त्यावर विखे यांनी मात्र अत्यंत सेफ उत्तर देत हा मुद्दाच निकाली काढला.

मंत्री विखे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सध्या अनेक मराठा नेते भाजपात येत असल्याने तुम्ही मुख्यमंत्रीपदापासून दूर जात आहात का?, असा प्रश्न पत्रकाराने विचारला त्यावर विखे पाटलांनी अत्यंत सेफ उत्तर दिलं. ‘मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कधीच नव्हतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मी काम करत आहे. अमित शाहांचंही मार्गदर्शन मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मी कार्यकर्त्यांसह वाटचाल सुरू केली. त्यामुळे संघटना राज्यात आणखी मजबूत कशी होईल यावर काम करावे अशी माझी भूमिका आहे’, असे विखे म्हणाले.

“हा अहंकार बरा नाही…” : शिस्त पालन समितीकडे पाठ फिरविल्याने शेट्टींचा तुपकरांवर संताप

त्यांच्या या उत्तरामुळे मुख्यमंत्रीदाच्या शर्यतीचा मुद्दा त्यांनी जवळपास निकाली काढल्याचे सांगितले जात आहे. मात्र राजकारणात काहीही घडू शकतं हे मागील दीड वर्षांपासून सुरू असलेल्या अनपेक्षित घडामोडींमुळे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी काय घडामोडी घडतात यावर पुढील राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.

तसे पाहिले तर विखे पाटील काँग्रेसमधून भाजपात आले. येथे आल्यानंतर त्यांनी आपला राजकीय करिष्मा दाखवत थोडक्याच काळात भाजपात चांगला जम बसविला. याआधीच्या भाजप सरकारच्या काळात त्यांच्याकडे गृहनिर्माण खात्याची जबाबदारी होती. त्यानंतर भाजप-शिंदे सरकारच्या काळात तर त्यांना थेट महसूलमंत्री पदाचीच लॉटरी लागली. महसूल खाते हे अतिशय वजनदार खाते मानले जाते. विखे यांच्या रुपाने हे खाते नगर जिल्ह्याला मिळाले. याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने हे खाते नगर जिल्ह्याकडेच होते.

तृणमूलला झटका! खासदार ओब्रायन राज्यसभेतून निलंबित; धनखड यांच्याबरोबरील वादाचा फटका

मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेने हैराण

इतकेच नाही तर मध्यंतरी विखे मुख्यमंत्री होतील अशीही चर्चा होती. सोशल मीडियावर तशा पोस्टही व्हायरल होत होत्या. यामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. पण, विखे यांनी या प्रकारांचे जोरदार खंडण केले होते. माझी बदनामी करण्यासाठी हा खोडसाळ प्रकार केला जात असल्याचे उत्तर विखे यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. मात्र, या प्रकारांमुळे जो काही संदेश जायचा होता तो गेलाच.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube