Irshalgad Landslide : ‘जागरूक राहा’, राज ठाकरेंनी महिनाभरापूर्वीच दिला होता धोक्याचा इशारा

Raigad Landslide : मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड या गावावर दरड कोसळली. अख्ख गावच या महाकाय दरडीखाली दबलं गेलं. अनेक जण दबले गेले तर काही जणांनी जीवही गमावला. या घटनेनंतर गावात मदतकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे. सगळीकडे आक्रोश अन् आर्त किंकाळ्या कानी पडत आहेत.
ही घटना कशी घडली, या घटना रोखण्यासाठी काय करता येईल यावर आता खल होईल, आदेश दिले जातील. मात्र, या घटना घडूच नयेत किंवा त्याची तीव्रता कमी होईल यासाठी काही प्रयत्न करणे गरजेचेच आहे. यासंबंधी जर आधीच संकेत मिळाले तर त्यानुसार खबरदारी घेणे महत्वाचे ठरते.
११ जून २०२३ – "यावर्षी कोकणात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळतील असं दिसतंय… शासन-प्रशासनाने जागृत राहावं." – राजसाहेब ठाकरे
आणि २० जुलै २०२३ रायगडच्या इरसालवाडीवर मध्यरात्री दरड कोसळणं आणि अख्खं गाव जमीनदोस्त होणं, माणसं दगावणं हे अतिशय वेदनादायी.
महाराष्ट्र सरकारनं अशा नैसर्गिक… pic.twitter.com/oG1xhsVNOa
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 20, 2023
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महिना आधीच दरडी कोसळण्याच्या घटनांवर भाष्य केले होते. कोकणात दरडी कोसळण्याची शक्यता यंदा जास्त आहे. त्यामुळे शासन-प्रशासनाने खबरदारी घ्यावी असे आवाहन राज ठाकरे यांनी 11 जून रोजी आयोजित एका कार्यक्रमातच केले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हीडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला राज ठाकरे यांचे 11 जून रोजीचे भाषण दाखविण्यात आले आहे. यावर्षी कदाचित कोकणात खूप मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतील. मला वाटतं प्रशासनानेही जागरूक राहिलं पाहिजे आणि आपल्या लोकांनाही जागरूक ठेवलं पाहिजे.
Raigad Landslide : क्षणात होत्याचं नव्हतं झालं.. इर्शाळवाडीवर कोसळला दुःखाचा डोंगर
महाराष्ट्र सरकारनं अशा नैसर्गिक दुर्घटनेत आपली माणसं मृत्युमुखी पडू नयेत म्हणून उपाययोजना करणं गरजेचं आहे. डोंगरपायथ्याशी असणाऱ्या वाडी-वस्तीचं पुनर्वसन कार्य हाती घ्यावं, पर्यावरण तज्ञांचा सल्ला घेऊन एक ‘पुनर्वसन योजना’ आणि डोंगरपायथ्याशी वस्ती असू नये किंवा बांधली जात असेल तर ती किती अंतरावर असावी याबाबत योजना आखावी, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.