रबडी कुल्फीच्या नावाखाली ग्राहकांची दिशाभूल? कांदिवलीतील कंपनीवर FDAची मोठी कारवाई

विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या फ्रोजन डेझर्ट उत्पादनांच्या लेबलिंगमध्ये आणि त्यावरील घटक पदार्थांच्या घोषणेमध्ये विसंगती आढळून आली.

  • Written By: Published:
Untitled Design 77

Major FDA action against a company in Kandivali : मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत दिशाभूल करणारे लेबलिंग आणि विनालेबल खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच नियम व विनियम 2011अंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीनुसार बृहन्मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी के. सी. इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन या आस्थापन्यावर छापा टाकला. तपासणीदरम्यान विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या फ्रोजन डेझर्ट उत्पादनांच्या लेबलिंगमध्ये आणि त्यावरील घटक पदार्थांच्या घोषणेमध्ये विसंगती आढळून आली.

संबंधित उत्पादनांची विक्री रबडी कुल्फी या नावाने केली जात असल्याचे समोर आले. मात्र उत्पादनावरील माहिती आणि प्रत्यक्ष वापरलेल्या घटकांमध्ये तफावत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. याशिवाय कोणतेही लेबल नसलेल्या क्रीमचाही साठा तपासणीदरम्यान आढळून आला. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत दिशाभूल करणारी जाहिरात आणि चुकीचे ब्रँडिंग अर्थात मिसलिडिंग अॅडव्हर्टाइजमेंट आणि मिसब्रँडिंगशी संबंधित तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष अधिकाऱ्यांनी नोंदवला आहे.

सोलापुरात पडद्यामागे नेमकं काय शिजतंय? राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तीन आमदार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला

या प्रकरणी संबंधित खाद्यपदार्थांचे अधिकृत नमुने घेऊन ते पुढील तपासणीसाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय रायकर आणि लखन मुखीयावाड, सहायक आयुक्त मेघना पवार तसेच सहआयुक्त महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली असून अन्न व्यवसाय चालकांनी उत्पादनांचे लेबलिंग, घटक पदार्थांची अचूक माहिती आणि जाहिरातींसंदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

follow us