जरांगे पाटील ‘अंतरवालीतून’ निघाले, पण ‘मुंबईत’ पोहचणारच नाहीत! शिंदे सरकारचा प्लॅन रेडी

जरांगे पाटील ‘अंतरवालीतून’ निघाले, पण ‘मुंबईत’ पोहचणारच नाहीत! शिंदे सरकारचा प्लॅन रेडी

मुंबई : ज्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या संंबंधितांना अर्थात सगेसोयऱ्यांनाही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये कुणबी संवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी करत मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 26 जानेवारीपासून ते मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी आज (20 जानेवारी) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून पायी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.

मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जरांगे पाटील यांना मुंबईबाहेरच थांबवले जाणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न तापवत असल्याने आणि मुंबईत येत असल्याने सरकारबद्दल राज्यभरात चुकीचा संदेश जाऊ शकतो, या भीतीने आता पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. सोबतच जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईत आल्यास वाहतूक आणि इतर गोष्टींचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे.

त्यामुळे जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईत न येऊ देता तो नवी मुंबईत पनवेल अथवा बेलापूर या ठिकाणी थांबण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यासाठी तशी विनंती जरांगे पाटील यांना करण्यात येणार आहे. जर ही मागणी मान्य केली नाही तर कायद्याने हा मोर्चा मुंबईत येणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

आता शिंदे सरकारचाही आक्रमक पवित्रा : वाढत्या मागण्यांनी जरांगेंसोबतच्या चर्चेची दारे बंद!

पोलीस प्रशासनानेही कसली कंबर :

जरांगे पाटील यांची पदयात्रा आणि उपोषण या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. जरांगे पाटील यांच्या दौऱ्यातील बहुतांश भाग हा पुणे, नवी मुंबई आणि मुंबई पोलीस प्रशासनावर देण्यात आला आहे. इथली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी या तिन्ही विभागातील पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीण विभागातील सर्व पोलिसांच्याही सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीतील सध्याच्या तयारीवर आणि जालना जिल्ह्यातील पहिल्या दिवसाच्या दौऱ्यावर जालना जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक शैलेश बलकावडे विशेष लक्ष ठेवून आहेत.  याशिवाय अहमदनगर आणि बीडच्या पोलीस अधिक्षकांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

Sharad Pawar : ‘ईडीचा वापर हत्यार म्हणून… ; शरद पवारांचा थेट PM मोदींवर हल्लाबोल

जरांगे पाटील यांच्याशी रोज संवाद साधण्याची, पदयात्रेमध्ये कोठेही कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का न लागण्याची जबाबदारी छत्रपती संभाजीनगरच्या विशेष पोलीस महानिदेशकांकडे देण्यात आली आहे. या सर्व पोलीस प्रशासनावरील नियंत्रण आणि नियमनाची जबाबदारी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय जरांगे पाटील यांच्या मोर्चासाठी कुठून किती लोक सहभागी होणार आहेत, त्यांची वाहन कोण पुरवणार? जेवणाची व्यवस्था कोण करणार? मोर्चासाठी निधी कुठून येणार यावर विशेष नजर ठेवण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube