मराठीचा डंका जगभर! न्यूयॉर्कमध्ये ‘गुजरात-महाराष्ट्र दिन 2026’ दिमाखात साजरा

Gujarat-Maharashtra Day 2026' न्यूयॉर्कमध्ये भारतीयांनी ‘गुजरात-महाराष्ट्र दिन 2026’ अत्यंत उत्साहात आणि सांस्कृतिक दिमाखात साजरा केला.

Gujarat Maharashtra Day 2026

Marathi’s impact all over world ‘Gujarat-Maharashtra Day 2026’ celebrated with enthusiasm in New York : न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांनी ‘गुजरात-महाराष्ट्र दिन 2026’ अत्यंत उत्साहात आणि सांस्कृतिक दिमाखात साजरा केला. 1 मे 2026 रोजी गुजराती असोसिएशन्स ऑफ नॉर्थ अमेरिका (GANA), न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावास आणि फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स (FIA) यांच्या संयुक्त पुढाकाराने हा भव्य कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला भारतीय वंशाचे नागरिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकात्मता, परंपरा आणि सांस्कृतिक ओळख जपणारा हा कार्यक्रम विशेष संस्मरणीय ठरला.

संस्कृती आणि परंपरेचा सुंदर मिलाफ

कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तुतीने झाली. त्यानंतर विविध मान्यवरांची भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सन्मान सोहळे आयोजित करण्यात आले. गुजरात आणि महाराष्ट्र ही राज्ये भारताच्या आर्थिक व सांस्कृतिक सामर्थ्याचे प्रतीक असून त्यांचा जागतिक स्तरावर प्रभाव आहे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायिका फालू शाह यांनी आपल्या मधुर गायनाने रंगत आणली, तर हार्दिक चौहान यांनी गुजराती लोकसंगीताचा जल्लोष न्यूयॉर्कमध्ये अनुभवायला लावला. ‘डान्सिंग स्टार्स’ या युवा गटाने गणपती परंपरा, गरबा आणि दांडिया यांचा सुरेख संगम असलेले फ्युजन नृत्य सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली.

खाद्यसंस्कृतीची खास मेजवानी

या सोहळ्याचे एक विशेष आकर्षण म्हणजे पारंपरिक शाकाहारी जेवण. समुदायातील महिला आणि पुरुषांनी घरगुती पदार्थ सादर केले, ज्यामुळे ‘घरच्या चवीचा’ अनुभव उपस्थितांना मिळाला. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी सांगितले की, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा भारताच्या एकूण GDP मध्ये सुमारे 25 टक्के वाटा आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी भारताच्या संघराज्य व्यवस्थेची तुलना संयुक्त कुटुंबाशी करत तिच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला.

भारतीय-अमेरिकन नेत्यांचा गौरव

या कार्यक्रमात न्यू जर्सीतील वेस्ट विंडसरचे महापौर हेमंत मराठे आणि पार्सिपनी-ट्रॉय हिल्सचे महापौर पुलकित देसाई यांचा सन्मान करण्यात आला. अभिनेत्री अर्चना जोगळेकर आणि पूजा झावेरी यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली. GANA चे अध्यक्ष सृजल परिख यांनी संस्थेच्या 10 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला, तर FIA चे अध्यक्ष आणि सह-संस्थापक अंकुर वैद्य यांनी गुजराती आणि मराठी समाजातील सहकार्याचे कौतुक करत ‘विविधतेत एकता’ या मूल्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या समारोपावेळी समाजसेवक सौरिन दवे आणि केनी देसाई यांचाही सन्मान करण्यात आला.

follow us