पत्ता विचारण्याचा बहाणा केला अन् तरुणाला घातल्या गोळ्या, जालन्यातील धक्कादायक घटना

Firing in Jalna : जालना शहरातील जुना जालना भागात मध्यरात्री एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. इथं दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपींनी दुचाकी थांबवून पत्ता विचारण्याचा बहाणा केला, त्यानंतर अचानक गोळीबार केला. यात ३१ वर्षांचा तरुण गंभीर जखमी झाला आहे. (Firing) मध्यरात्री अशाप्रकारे गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात बराच वेळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जुना जालना येथील मुजैद चौकात घडली. तर अकबर खान बाबर खान असं हल्ला झालेल्या ३१ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो या गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्यावर हा गोळीबार केला. ही घटना मध्यरात्री २ वाजून १० मिनिटाच्या सुमारास घडली.
आता आरक्षण घेऊनच मागं येणार अन्यथा;29 ऑगस्टच्या मोर्चाबद्दल काय म्हणाले जरांगे पाटील
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, घटनेच्या वेळी मध्यरात्री दोन वाजता दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून मुजैद चौकात आले होते. त्यांनी अकबर खान यांना पत्ता विचारला. पत्ता सांगण्यासाठी अकबर पुढे आले, यावेळी संधीचा फायदा घेऊन आरोपींनी सोबत आणलेली बंदूक अचानक बाहेर काढली आणि गोळीबार केला. या गोळीबारात अकबर खान यांच्या जबड्याला गोळी लागली आणि ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जुन्या वैमनस्यातून हा गोळीबार झाला की यामागे दुसरे काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.