Aaditya Thackeray : पुन्हा शंभर आमदार निवडून आणण्याची धमक!
औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माझ्या मनात कायम या राज्यातील जनता आहे. कोणत्याही शहरात सभा घेतली तरी लोकं हजारोंच्या संख्येने गर्दी करत आहेत. आम्हाला प्रेम देत आहेत. तर दुसरीकडे आपण गद्दार गँग बदलचे चित्र पाहिले तर काय दिसते. ज्यांच्या मनात खुर्च्या होत्या. त्यांच्या कार्यक्रमात फक्त खुर्च्याच दिसत आहे. लोकं त्यांच्या सभेला फिरकत नाही. हे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना कधी समजणार आहे. आमचे आमदार तुम्ही पळवून न्या. शून्यातून पुन्हा १०० आमदार निवडून आणण्याची आमच्यात धमक आहे, असा खणखणीत इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युवासेनेचे अध्यक्ष तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला.
युवासेनेचे आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरु आहे. या यात्रेचा औरंगाबाद येथे दिवसभरात झालेल्या पाचव्या कार्यक्रमात ते जनतेशी संवाद साधत होते. आदित्य ठाकरे म्हणाले की, मी जेथेही जातो. तेथे लोकांचे भरभरून प्रेम मिळत आहेत. लोकांच्या प्रेम, आशीर्वाद मिळत आहे. याच आशिर्वादाच्या, लोकांच्या पाठिंबाच्या जोरावर आपल्याला पुन्हा महाराष्ट्राला प्रगती पथावर न्यायचे आहे.
चाळीस गद्दार आमदारामुळे या राज्यात आपल्या कार्यकर्त्यांना आमदार होण्याची चांगली संधी मिळाली आहे. ज्यांनी खोके घेतलेत ते गेल्या सहा महिन्यांत एकदा तरी म्हटलेत का, की आम्ही खोके घेतले नाही. कसे म्हणतील, कोणत्या तोंडाने ते म्हणतील आम्ही खोके घेतले नाही. कारण ते खोके घेऊनच मिंधे गटात गेले आहेत. पण येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता त्यांना कायमची घरी पाठवून निवृत्त करणार आहे. त्यामुळे आपल्या नव्या दमाच्या तरुण कार्यकर्त्यांना आमदार होण्याची संधी चालून आली आहे, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला.