धनश्री पठाडे हिचे ग्लोबल शेपर्स ॲन्युअल समिटमध्ये प्रभावी प्रतिनिधीत

World Economic Forum: 'सिग्नल्स फॉर फ्युचर' या मुख्य संकल्पनेवर आधारित या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातील 120 हून अधिक देशांतील सुमारे 450 युवा नेते सहभागी झाले होते.

  • Written By: Published:
Dhanshree Pathade

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याची कन्या धनश्री शेषराव पठाडे (Dhanashree Sheshrao Pathade) हिने नुकतेच स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (World Economic Forum) मुख्यालयातील ग्लोबल शेपर्स ॲन्युअल समिट-2026 मध्ये पुणे हबचे प्रभावी प्रतिनिधीत्व करत जागतिक व्यासपीठावर कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.

‘सिग्नल्स फॉर फ्युचर’ या मुख्य संकल्पनेवर आधारित या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातील 120 हून अधिक देशांतील सुमारे 450 युवा नेते सहभागी झाले होते. स्थानिक समस्यांवर युवकांच्या माध्यमातून शाश्वत उपाय शोधणे आणि जागतिक स्तरावर सकारात्मक बदल घडवणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. ग्लोबल शेपर्स कम्युनिटी ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक भाग आहे.

विविध सत्रांत सहभाग
छत्रपती संभाजीनगरची धनश्री पठाडे सध्या ग्लोबल शेपर्स कम्युनिटी, पुणे हबच्या क्युरेटर म्हणून कार्यरत आहेत. या परिषदेदरम्यान तिने एआय, शाश्वत विकास, मानसिक व महिला आरोग्य, युवक रोजगार, प्लास्टिक प्रदूषण, डिजिटल सुरक्षितता आणि लॉन्जेव्हिटी इकॉनॉमी या विषयांवरील सत्रांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

यशाची श्रेय ग्लोबल शेपर्स कम्युनिटीला
या यशाचे श्रेय धनश्री पठाडे यांनी संपूर्ण ग्लोबल शेपर्स कम्युनिटी पुणे हबमधील सर्व शेपर्स, माजी सदस्य आणि आपल्या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येकाला दिले आहे. एका सामान्य मराठी मुलीवर विश्वास ठेवून, तिला नेतृत्वाची संधी देऊन आणि समाजासाठी काम करण्याचा आत्मविश्वास देणाऱ्या या समुदायामुळेच जागतिक स्तरावर पुणे हबचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याचे धनश्रीने सांगितले.यंदाच्या कार्यकाळात हरित कुमार ( व्हाईस क्युरेटर करत आहे) आणि शर्वरी रास्ते (Impact Officer) यांच्यासोबत धनश्री पठाडे पुणे हबच्या क्युरेटरशिप टीमचे नेतृत्व करत आहेत. २०१२ मध्ये अंशू गौर यांनी पुण्यात ग्लोबल शेपर्स हबची स्थापना केली. तेव्हापासून अनेक शेपर्स आणि माजी सदस्यांनी समाजाभिमुख कार्य, नेतृत्व आणि समुदायभावनेची समृद्ध परंपरा निर्माण केली आहे. याच परंपरेचा आणि संस्कृतीचा वारसा पुढे नेत, पुणे हबने गेल्या अनेक वर्षांत उभा केलेला प्रभाव अधिक सक्षम करण्यासाठी आणि नव्या युवकांना समाजपरिवर्तनाच्या प्रवासात सहभागी करून घेण्यासाठी यंदाची क्युरेटरशिप टीम सातत्याने कार्यरत आहे.

स्थानिक तरुणांनी पुढाकार घ्यावा
मराठवाड्याच्या मातीतून सुरू झालेला प्रवास जागतिक व्यासपीठापर्यंत पोहोचू शकतो, हा विश्वास देणारा हा अनुभव आहे. येथील दुष्काळ, पाणीटंचाई, शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी स्थानिक तरुणांनी पुढे येणे आवश्यक आहे. ग्लोबल शेपर्ससारखी व्यासपीठे त्यांना नक्कीच जागतिक मार्गदर्शन करून संधी मिळवून देतील, असे धनश्री पठाडे म्हणाली.

follow us