‘मंत्रिपद नुसती भुषवायची नसतात’ : CM शिंदेंसमोरच अजितदादांनी घेतली मराठवाड्यातील मंत्र्यांची शाळा
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला यंदा चांगली मंत्रिपद मिळाली आहेत, त्याचा फायदा करुन घ्या. मंत्रिपदे नुसते भुषवायची नसतात, तर त्या मंत्रिपदातून लोकांना काय फायदा करून दिला, हेही पाहायचे असते. आपण आज लोकांसाठी काय केले, याचे रात्री झोपताना आत्मपरिक्षण करत जा. उद्या काय करायचे आहे, याचे नियोजन करत जा, असं म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोरच मराठवाड्यातील सर्व मंत्र्यांची शाळा घेतली. (Inauguration of various programs of Sambhajinagar Municipal Corporation and inauguration of some development works were done by Chief Minister Eknath Shinde and Ajit Pawar)
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज (16 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची विशेष बैठक होत आहे. या दरम्यान, सकाळी शहरातील वंदे मातरम सभागृहात महापालिकेच्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन आणि काही विकासकामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते पार पडले, यावेळी अजित पवार बोलत होते.
काय म्हणाले अजित पवार?
मराठवाड्याने महाराष्ट्राला खूप काही दिलं. यात स्वर्गीय शंकराव चव्हाण, विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर असे चार मुख्यमंत्री दिले. या सर्वांची जवळपास 15 ते 20 वर्षाची कारकीर्द आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली. शिवाय गोपीनाथराव मुंडे, सुंदरराव साळुंखे असे उपमुख्यमंत्री दिले. शिवराज पाटील चाकूरकरांसारखे केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष दिले. अनेक खासदार, आमदार, मंत्री दिले. माझ्या मराठवाड्याच्या मातीने अनेक संत दिले, महात्मे दिले, समाजसुधारक दिले, साहित्य, कलावंत, विचारवंत दिले. या सगळ्यांनी या मराठवाड्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला.
Sanjay Raut : टीका केल्यावर ‘सुभेदार’ सुभेदारीवर चालले; मुक्काम बदलल्यानंतर राऊतांची शिंदेंवर टीका
मराठवाड्याला अनेकदा पॅकेज दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना सांगायचं आहे की, दर आठवड्याला आढावा घेतला पाहिजे. कुठले प्रकल्प मार्गी लावले, कुठलं काम रेंगाळलं, मग यासाठी कधी मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, कधी उपमुख्यमंत्री कार्यालायाची मदत घेतली पाहिजे. असं केलं तरच प्रश्न सुटतील. योजना पूर्णत्वास जाताना दिसतील.
मराठवाड्यातील काही भागांमध्ये स्वच्छतेला महत्व दिले पाहिजे. पिण्याच्या पाण्याला महत्व दिले पाहिजे. आपली पिण्याच्या पाण्याची योजना जायकवाडीवरून आहे, किती वर्ष झाली? मला काही कळतच नाही किती वर्ष लागतात. कॉन्ट्रॅक्टर चांगला असला तर योजना वेळेत झालीच पाहिजे. तिथल्या शहरवासियांना वेळेमध्ये पाणी मिळालेच पाहिजे. स्वच्छता झालीच पाहिजे, असा आग्रह अजितदादांनी बोलून दाखविला.
Devendra Fadnavis : मराठवाड्यातील सर्व निर्णयांची अंमलबजावणी; अडीच वर्ष माशा मारत होता का?
मराठवाड्यात अतुल सावे यांच्याकडे गृहनिर्माण खाते आहे. त्यांनी शहरात चांगल्या हाऊसिंग सोसायटी व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शहरात नवीन गेस्ट हाऊन होणे गरजेचे आहे. मंत्रिपदे मिळाली आहेत तर त्याचा फायदा घ्या ना. मंत्रिपदे नुसते भुषवायची नसतात, तर त्या मंत्रिपदातून लोकांना काय फायदा करून दिला, हेदेखील पाहायचे असते. आपण आज लोकांसाठी काय केले, याचे रात्री झोपताना आत्मपरिक्षण करत जा. उद्या काय करायचे आहे, याचे नियोजन करत जा, अशा शब्दांत मराठवाड्यातील मंत्र्यांचे कान टोचले.
यावेळी अजित पवार यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री मराठवाड्यासाठी ज्या काही योजना जाहीर करतील, त्यासंदर्भात मी १५ दिवसांनी बैठक घेईल, अशी ग्वाही दिली. तसंच स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनीही योजना प्राधान्याने पूर्ण कशा होतील, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, स्थानिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.