शिंदेंची पुन्हा कोंडी! दहावी-बारावीच्या विद्यार्थांचा विचार करत जरांगेंनी जाहीर केला मायक्रो प्लॅन
Manoj Jarange on Maratha Reservation : सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी दोन दिवसांत करा. अन्यथा 24 फेब्रवारीपासून आंदोलन सुरु करणार आहोत. आंदोलना दरम्यान प्रत्येकाने आपापली गावे सांभाळायची आहेत. कुणीही तालुका किंवा जिल्ह्यात येऊ नये. 24 फेब्रुवारीपासून दररोज सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि ज्यांना जमणार नाही त्यांनी दुपारी 4 ते 7 दरम्यान आंदोलन करावे, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी आगामी आंदोलनाचे प्लॅनिंग सांगितले. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात काल मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. यानुसार मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.
जरांगे पाटील म्हणाले, कुणीही जाळपोळ करायची नाही. परीक्षा सुरू आहेत. गावागावात रास्ता रोको करायचा. अधिकारी आल्याशिवाय निवेदन द्यायचं नाही. राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करा. सोशल मीडियावर फोटो टाका. अधिकारी नसला तर ग्रामसेवक, तलाठ्याला निवेदन द्या. राजकीय लोकांनी आमच्या दारावरून आता यायचं नाही. आम्ही गेलो होतो आधी. त्यांनी लक्ष दिलं नाही. आता आपणही त्यांना येऊ द्यायचं नाही. या लोकांच्या दारात कुणीच जायचं नाही. यांची किंमत तुम्ही वाढवली, आमदार खासदार तुम्ही केलं. नेता आपल्या दारी आला तर दार लावून घ्या. राजकीय नेत्यांच्या दारात कुणीही जाऊ नका, असे जरांगे पाटील म्हणाले.
आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक घेऊ नका
निवडणुकीची आचारसंहिता आम्ही मोडत नाही. मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक घेऊ नका, ही आमची निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला विनंती. निवडणूक घेतली तर तुम्हाला आदर राखून घ्यायचा नाही असं आम्ही समजू. जर प्रचाराच्या गाड्या आल्या तर त्या घ्या कोठ्यात लावा निवडणूक झाल्यानंतर परत द्या. गाडी फोडू नका, जाळू नका. प्रचारासाठी आमच्या गावात येऊ नका असे त्यांना फोन करून सांगा. आज आठ महिने झाले तरी सरकारने कोणतीही निवडणूक घेतलेली नाही. तिथे आता प्रशासक नेमले आहेत हे तुम्हाला चालतं का? असा सवाल उपस्थित करत आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकला काय हरकत आहे. ही राज्यापासून केंद्रापर्यंत विनंती. मोदी साहेब यांना समजावून सांगा निवडणुका पुढे ढकला असे जरांगे पाटील म्हणाले.
.. तर समाजातील वयोवृद्ध उपोषण करणार
राज्यात मराठा समाजाचे 25 ते 30 लाख वयोवृद्ध व्यक्ती असतील. सरकारने जर सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणीचा निर्णय घेतला नाही तर समाजातील वयोवृद्धांनी आमरण उपोषणास बसावे. वयोवृद्धांना उपोषणाची वेळ येऊ द्यायची नसेल तर सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा. सरकारने इतकी वाईट वेळ आणू नये. त्यांचं उपोषण ही सरकारसाठी शरमेची बाब असेल. सरकारनं आतातरी शहाणं व्हावं, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.ट
आम्ही शांततेतच आंदोलन करणार
आता फक्त अधिसूचनेचीच अंमलबजावणी बाकी आहे. त्यांनी (राज्य सरकार) अंमलबजावणी केली असती तर त्यांच्या कपड्यांवरचा गुलाल पंधरा दिवस निघाला नसता. पण, त्यांना हे करता आलं नाही. त्यासाठी सुद्धा नशीब लागतं. आम्हाला कुणाच्या वाटेला जायचं नाही. मी आहे तोपर्यंत शांतततेच आंदोलन करणार आणि आरक्षण घेणार, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.