मराठवाड्याच्या हवामानात मोठा बदल; अर्ध-शुष्क हवामानाचा धोका वाढला, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
Marathwada Climate Change : वाढते तापमान आणि पावसाच्या बदलत्या पद्धतीमुळे मराठवाड्याच्या हवामानात दीर्घकालीन बदल होत असल्याचं समोर.
Marathwada Climate Change : मराठवाड्यात दुष्काळ आणि पाणीटंचाई ही (Marathwada) अनेक दशकांपासूनची समस्या असली, तरी आता या भागाच्या हवामानातही दीर्घकालीन बदल होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. वाढते तापमान, पावसाच्या अनियमित पद्धती आणि भूजलाचा बेसुमार वापर यामुळे शेती आणि जलव्यवस्थापनासमोर गंभीर आव्हाने निर्माण होत आहेत. मराठवाड्यातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याने पावसाचे प्रमाण, त्याचे वितरण आणि दोन पावसांमधील अंतर यावर पिकांचे उत्पादन ठरते. यापूर्वी १९७२ आणि २०१५ मध्ये या भागाने भीषण दुष्काळाचा सामना केला आहे. मात्र आता दुष्काळाच्या पारंपरिक समस्येबरोबरच तापमानवाढ आणि हवामानातील दीर्घकालीन बदल ही नवी चिंता निर्माण झाली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या MAUSAM या संशोधनपत्रिकेत १ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासातून या बदलांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. Identifying the Climate Zones Shifts of Indian Meteorological Subdivisions: Insights from Historical Records असे या संशोधनाचे नाव आहे. या अभ्यासासाठी १९५१ ते २०२० या ७० वर्षांच्या कालावधीतील हवामानविषयक नोंदींचे विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये पावसाचे प्रमाण, दिवसाचे कमाल तापमान आणि रात्रीचे किमान तापमान या महत्त्वाच्या घटकांचा समावेश होता. दीर्घकालीन नोंदींच्या आधारे देशातील विविध हवामान विभागांमध्ये झालेले बदल शोधण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला आहे.
Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
या संशोधनातील निष्कर्ष आणि नकाशांनुसार मराठवाड्यासह पश्चिम विदर्भातील बहुतांश भागांच्या हवामान वर्गीकरणात महत्त्वाचा बदल झाल्याचे दिसून आले आहे. १९६१ ते १९९० या कालावधीत हा प्रदेश उष्णकटिबंधीय सवाना हवामान विभागात मोडत होता. मात्र १९९१ ते २०२० या कालावधीत त्याची वाटचाल उष्ण अर्ध-शुष्क हवामान विभागाकडे झाल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बदलामागे केवळ पावसातील चढ-उतार कारणीभूत नसून दिवसाचे आणि रात्रीचे तापमान वाढणे हा महत्त्वाचा घटक असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या हवामानात होत असलेला बदल हा केवळ पावसापुरता मर्यादित नसल्याचे अधोरेखित होते.
हवामानातील या बदलांचा परिणाम आगामी काळात मराठवाड्यातील शेती, पाणीपुरवठा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा वेगाने कमी होणे, पिकांवर उष्णतेचा ताण वाढणे आणि सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढणे अशी आव्हाने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यासाठी एकच धोरण राबवण्याऐवजी प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील पर्जन्यमान, तापमान आणि भूजलाची स्थिती लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करण्याची गरज आहे. विशेषतः जलसंधारण, पाणी पुनर्भरण, पीक पद्धतीतील बदल आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे ठरणार आहे. हवामानातील बदलांचे हे संकेत लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर मराठवाड्यापुढील दुष्काळाचे संकट भविष्यात अधिक गंभीर होऊ शकते.