Letsupp विषय सोपा : पंकजा मुंडे यांना राजकारणातून का हवाय ब्रेक? घ्या समजावून…
Letsupp विषय सोपा On Pankaja Munde
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या आज त्रस्त दिसल्या. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून त्यांच्याविषयी माध्यमांतून वेगवेगळ्या प्रकारच्या कंड्या पिकल्या. त्यांनी पण अशी विधाने केली की त्या भाजपवर नाराज आहेत, असा अर्थ निघू शकतो. मुंडे यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या काही नेत्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली. पण पंकजा यांना आधी देऊन ऐनवेळी ती काढून घेण्यात आली. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाला सत्तेत स्थान भाजपने एकाच वेळी अनेक राजकीय पक्षी मारले. पण त्याचा फटका पंकजा यांनाही बसला की काय, अशी शंका आहे. त्यामुळे त्या काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा जावईशोध एका वाहिनीने लावला. या वाहिनीची बातमी अनेकांनी नंतर फाॅलो केली. त्यामुळे विनाकारण पुन्हा पंकजा या संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या. यातूनच त्यांनी आता आपल्याला राजकारणातून काही दिवसांसाठी ब्रेक हवा आहे, असे विधान केले. असे करण्यामागची काय कारणे आहेत, हे या लेखामध्ये समजावून घेऊया.
१)पंकजा मुंडे यांच्याविषयी सातत्याने निगेटिव्ह
बातम्या येत आहेत. त्या काॅंग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बिनबुडाच्या बातमीने त्यांना मनस्ताप झाला. तो कमी करण्याची त्यांना गरज आहे.
२)भाजप-शिवसेना यांच्या युतीत आता राष्ट्रवादी काॅंग्रेसने प्रवेश केला आहे. त्याचा नक्की काय परिणाम होणार, याचा अभ्यास करण्यासाठी पंकजा यांना गरज वाटली असावी.
३)राष्ट्रवादी काॅंग्रेससाठी बीड हा देखील बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत आल्याने पंकजा यांच्या शक्तिस्थळांना धक्के बसू शकतात. हा धोका कमी करण्यासाठी रणनीती आखण्यासाठीचे नियोजन त्या करू शकतात.
४)भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी युतीच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे मंत्री झाल्याने पंकजा यांना हक्काच्या परळी मतदारसंघावर भविष्यात पाणी सोडावे लागेल. कोणत्या मतदारसंघातून पुढे बांधणी करायची, याचा विचार त्या करू शकतात.
५)आपण भाजपमध्ये नाराज असल्याचा संदेश पंकजा या ब्रेकच्या माध्यमातून देऊ शकतात. त्यामुळेच भाजपचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी संपर्क करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांना सांगावे लागले.
६)पंकजा मुंडे या मध्य प्रदेशच्या भाजपच्या प्रभारी आहेत. या ठिकाणी डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या धामधुमीच्या काळात पंकजा यांनी सुट्टीवर जाऊ नये, यासाठी भाजपचे प्रयत्न करतील. असा पंकजा समर्थकांचा होरा.
७)राष्ट्रवादीशी भाजपच्या युतीनंतर अनेक विधानसभा मतदारसंघातील स्थानिक समीकरणे बदलली आहेत. या ब्रेकच्या काळात पंकजा आपल्या स्थानिक समर्थकांशी संपर्क आणखी वाढवतील.
८)पंकजा यांच्यासाठी २०२४ हे वर्ष महत्वाचे आहे. त्याची पूर्वतयारी करण्यासाठी पंकजा यांना हा ब्रेक महत्त्वाचा वाटत असावा.