एका बाजूने चर्चा सुरू ठेवली तर दुसऱ्या बाजूने लाठीचार्ज; पवारांनी सांगितला आंदोलनस्थळचा घटनाक्रम
Jalna Maratha Aandolan : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात काल मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या लाठीमाराचे व्हिडिओही समोर आले आहेत. शांततापूर्ण आंदोलन सुरू असतांना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानं संतप्त आंदोलकांनी दगडफेक करून बसही जाळल्या. दरम्यान, आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आज राष्ट्रवीदीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आंदोलनास्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. यावेळी सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही, एका बाजूने चर्चा सुरू ठेवली तर दुसऱ्या बाजूने लाठीहल्ला केला, असं ते म्हणाले.
शरद पवारांनी आज जालण्यात जाऊन मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे आंदोलनकर्ते सहकारी यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी आंदोलकांशी चर्चा केली. आपल्या भाषणात पवार म्हणाले की, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी जुनीच आहे. सरकारच्या दुर्लक्षापणामुळे मराठा आंदोलकांना वारंवार उपोषण करावं लागत आहे. राज्यातील मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय केला. त्यांच्याशी बोलणं झालं. एका ठराविक दिवसात प्रश्नांची तड लावण्याचं ठरलं. काही चर्चा झाली. आश्वासने दिली. दुर्दैवानं जे काही ठरलं होतं, त्याची अंमलबजावणी झाली नाही, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. असं पवार म्हणाले.
ते म्हणाले की, सरकारने दिलेला शब्द न पाळल्याने आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मी काल सर्व माहिती घेतली. मनोज आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करायला पोलीस आले. त्यांनी बोलणी केली. एका बाजूने चर्चा सुरू ठेवली तर दुसऱ्या बाजूने लाठीहल्ला केला. बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी हवेत गोळीबार करून आंदोलकांना पांगवले. या बंदुकांत छर्रे वापरले. काही लोकांना छर्रे लागले, असं पवार म्हणाले.
दरम्यान, आंदोलकांनी शांततेने आंदोलन सुरू ठेवावं, असा सल्ला शरद पवार यांनी आंदोलकांना दिला.