टॅंगो ॲपवर मैत्री, खासगी व्हिडिओची धमकी अन् 52 लाखांची फसवणूक; बीडमध्ये दिल्ली-नेपाळ कनेक्शनचा संशय

Tango App Blackmail Case : टॅंगो ॲपवर झालेल्या ओळखीचा वापर करून एका व्यक्तीला 37 दिवसांत 52 लाखांचा गंडा घातला.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 03T191437.524

Tango App Blackmail Case : सोशल मीडिया आणि मोबाइल ॲपच्या माध्यमातून ओळख वाढवून खासगी व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करत (Beed) एका व्यक्तीकडून तब्बल 52 लाख रुपये उकळल्याचा प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी श्रीकृष्णा अनंता केसकर (वय 36, रा. बीड, सध्या पुणे) यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फसवणुकीत दिल्ली आणि नेपाळशी संबंधित काही संशयितांचे कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, 2024 मध्ये ते बीडमधील हॉटेल ग्रेड यशोदा येथे वास्तव्यास होते. याच काळात ‘टॅंगो’ ॲपवर त्यांची प्रिया पुत्री देवी प्रसाद नावाच्या महिलेशी ओळख झाली. सुरुवातीला संवाद आणि मैत्री वाढली. त्यानंतर संबंधित महिलेने त्यांना व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. या कॉलदरम्यान त्यांचे खासगी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आल्याचा आरोप आहे. पुढे हे व्हिडिओ इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी देत पैशांची मागणी सुरू करण्यात आली.

खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवून आरोपींनी फिर्यादीकडून वेगवेगळ्या माध्यमांतून पैसे घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. 7 मे ते 13 जून 2024 या कालावधीत इंडसइंड बँकेतील त्यांच्या खात्यातून विविध बँक खात्यांवर पैसे पाठवण्यात आले. याशिवाय फोन पे, गुगल पे आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातूनही आर्थिक व्यवहार करण्यात आले. अरुण जांगीर, नौशाद अली, एस. पी. ट्रेडर्स आणि सत्यम ॲन्ड सन्स यांच्याशी संबंधित खात्यांमध्ये रक्कम जमा झाल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.

AI आणि ऑटोमेशनच्या वाढत्या वापरामुळे स्टॅंडर्ड चार्टर्डमध्ये 2030 पर्यंत 7 हजारांहून अधिक नोकऱ्यांवर गंडांतर

अवघ्या 37 दिवसांत झालेल्या या व्यवहारांतून एकूण 52 लाख रुपये उकळण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात प्रिया देवी प्रसाद आणि तमन्ना रावत या दोन महिलांची नावे समोर आली आहेत. संबंधित महिला नेपाळी नागरिक असल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार केल्याचा आणि भारतीय महिलांना परदेशात वेश्याव्यवसायासाठी पाठवणाऱ्या कथित रॅकेटशी त्यांचा संबंध असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संबंधित बँक खाती आणि डिजिटल माध्यमांचा वापर यामुळे फसवणुकीचे मोठे जाळे असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. टॅंगो ॲपवरील अकाउंट, मोबाइल क्रमांक, व्हिडिओ कॉल आणि क्रिप्टोकरन्सी व्यवहारांची तपासणी केल्यानंतर या प्रकरणातील इतर धागेदोरे समोर येऊ शकतात. मात्र, महिलांचे नेपाळी नागरिकत्व, बनावट पासपोर्ट आणि कथित रॅकेटशी असलेले संबंध या आरोपांची अद्याप पोलिसांकडून पुष्टी झालेली नाही.

श्रीकृष्णा केसकर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. सोशल मीडिया आणि ॲपच्या माध्यमातून ओळख वाढवून खासगी व्हिडिओच्या आधारे आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दिल्ली आणि नेपाळशी संबंधित संशयितांची भूमिका काय आहे, तसेच 52 लाख रुपयांचा पैसा नेमका कोणत्या खात्यांमध्ये गेला, याचा तपासातून उलगडा होण्याची शक्यता आहे.

follow us