हा हंबरडा मोर्चा शेतकऱ्यांसाठी नव्हता ठाकरेंसाठी होता; मंत्री संजय शिरसाट यांची घणाघाती टीका
उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिरसाट म्हणाले की, ‘हंबरडा मोर्चा संपूर्णपणे फेल गेलाय. मोर्चात एकही शेतकरी किंवा सामान्य माणूस नव्हता.

आज छत्रपती संभाजी नगरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने हंबरडा मोर्चाचं आयोजन केलं होतं. (Shirsat) या मोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. या मोर्चात उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. तसंच, सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करावा असं आवाहन केलं. अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या या हंबरडा मोर्चावर मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना लातूरमध्ये बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, ‘हंबरडा मोर्चा संपूर्णपणे फेल गेलाय. मोर्चात एकही शेतकरी किंवा सामान्य माणूस नव्हता. मराठवाड्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलून त्यांनी मोर्चा काढला. ही वेळ शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे आहे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे दुःख जाणून घेण्याची आहे, त्यांना मदत करणे हे महत्त्वाचं आहे मोर्चा काढून काय साध्य करायच आहे? मोर्चा काढून शेतकरी रडतोय त्याचे फोटो तुम्हाला छापायचेत. पण आमची प्रामाणिक भूमिका आहे विरोधी पक्ष यांनी देखील सोबत येऊन शेतकऱ्यांसाठी काम केलं पाहिजे.
शेतकऱ्यांसाठी इतिहासातील सर्वात मोठं पॅकेज ही फडणवीसांची इतिहासातील सर्वात मोठी थाप -ठाकरे
पुढे बोलताना शिरसाट म्हणाले, अशा काळात आम्ही विरोधी पक्षाला विरोधी पक्ष मानत नाही. शेतकऱ्यांवर आलेला संकट प्राधान्याने घेतो. म्हणूनच सरकारने 31 हजार 628 कोटीचे पॅकेज जाहीर केलं. सरकारने जी घोषणा केली ते शेतकऱ्यांना मिळणार आम्ही आजही या मदतीवर समाधानी नाहीत. आम्हाला केंद्राकडून काही मदत शेतकऱ्यांसाठी मागवायची आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले की, ‘आज ठाकरे गटाकडून मोर्चा काढून त्यांची केविलवाणी अवस्था त्यांनी दाखवली. आम्ही देखील 2022 साली हंबरडा फोडला होता, तेव्हापासून हे रडत आहेत. टीका करण्याशिवाय त्यांनी काही केलं नाही. हा हंबरडा शेतकऱ्यांचा नसून ठाकरे गटाचा आहे. पक्ष फुटला त्याचा हंबरडा, आमदार पळून गेले त्याचा हंबरडा, खासदार गेले त्याचा हंबरडा, पदाधिकारी गेले त्याचा हंबरडा, त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिले नाही त्यामुळे तो हंबरडा मोर्चा आहे असंही शिरसाट यावेळी म्हणाले.